शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठीचा तांदूळ संपला, सांगली जिल्ह्यातील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:38 PM2023-01-11T15:38:53+5:302023-01-11T15:39:28+5:30
तांदळाचा पुरवठाच हाेत नसल्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार संद्या बंद
सांगली : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील २ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यासाठी दर दोन महिन्याला १२०० टन तांदूळ लागतो. पण, सध्या जिल्ह्यातील २५०० शाळांमधील १०० टक्के तांदूळ संपला असून अजूनही पुरवठा विभागाकडून मिळालेला नाही. त्यामुळे सध्या पोषण आहारात खंड पडेल, अशी स्थिती जिल्ह्यातील शाळांमध्ये निर्माण झाली आहे.
पहिली ते आठवीच्या २५०० अनुदानित शाळांमधील २ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जाताे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांमधील तांदूळ संपल्यामुळे मुलांचे हाल होत असल्याने तातडीने मिळावा, अशी विनंती केली होती. अनेकवेळा शासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार ही केला.
परंतु, तांदळाचा पुरवठाच हाेत नसल्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार संद्या बंद आहे. काही शाळांनी उधारी करुन आठवडाभर पोषण आहार चालू ठेवला होता. पण, गेल्या पंधरा दिवसापासून तांदूळ संपूनही प्रशासनाकडून त्याचा पुरवठा झाला नाही, असे जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापकांचे मत आहे.
तांदळाची टंचाई
शालेय पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ दोन महिन्यातून एकदा उचलला जातो. जिल्ह्यातील २५०० शाळांना दोन महिन्यासाठी १२०० टन तांदळाची गरज आहे. गेल्या महिन्याभरापासून शाळांमधील तांदूळ संपला असून काही शाळांमध्ये शिल्लक असलेल्या तांदळावर कस तर पंधरादिवस पोषण आहार चालू होता. सध्या पूर्णच तांदूळ संपला असून तातडीने १२०० टन तांदळाची गरज आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.