सांगली :जिल्ह्यात शाळा सिध्दी उपक्रमांतर्गत बाराशे शाळा अ श्रेणीत, यादी प्रसिध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:17 PM2017-12-26T13:17:04+5:302017-12-26T13:25:35+5:30
शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून शाळा सिध्दी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन हजार ९८३ शाळांपैकी एक हजार २३९ शाळांना अ श्रेणी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
सांगली : शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून शाळा सिध्दी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन हजार ९८३ शाळांपैकी एक हजार २३९ शाळांना अ श्रेणी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
मुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी शाळांची गुणवत्ता प्रामाणित करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाचा शाळा सिध्दी उपक्रम राज्यात सुरू केला आहे. याबाबतचा शासन निर्णय ३० मार्च २०१६ रोजी घेण्यात आला होता.
या कार्यक्रमांतर्गत शाळांना शाळा सिध्दीच्या संकेस्थळावर स्वयंमूल्यमापनविषयक माहिती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शाळांनी आपले स्वयंमूल्यमापन हे शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या एकमताने पूर्ण करावयाचे होते.
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यातील दोन हजार ९८३ शाळांची आॅनलाईन माहिती भरण्यात आली होती. त्या स्वयंमूल्यमापन केलेल्या माहितीनुसार श्रेणीनुसार मूल्यमापन करून प्रत्येक शाळेला ग्रेड दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळांपैकी एक हजार २३९ शाळांना अ श्रेणी मिळाली.
शाळा सिध्दी शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थी उपस्थिती, प्रगत शाळा, लोकसहभाग, डिजिटल माध्यमांचा वापर, शाळाबाह्य बालके, प्रत्यक्ष प्रवेशित बालकांची संख्या, विषयानुसार ज्ञानरचनावादी साहित्य, शालेय परिसर, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, माध्यान्ह भोजन, स्वयंपाकगृह व भांडी, पेयजल, हात धुण्याच्या सुविधा, शौचालय, अध्यापनाचे नियोजन, वर्ग व्यवस्थापन, शिक्षकांची उपस्थिती यासारखे निकष घालून त्यांना स्वयंमूल्यांकन देण्यात आले आहे.
यापूर्वी उपक्रमशील शाळा लोकसहभागातून विविध उपक्रम राबवित होते. त्या माध्यमातून शाळांना आयएसओ मानांकन दिले जायचे. जिल्ह्यातील सर्वाधिक आयएसओ शाळा खानापूर तालुक्यातील होत्या. मात्र शाळा सिध्दी उपक्रमांतर्गत सर्वाधिक अ श्रेणी ग्रेड मिळविलेल्या शाळा जत तालुक्यातील आहेत. जत तालुक्यातील २११ शाळांचा समावेश आहे. त्यानंतर तासगाव तालुक्यात १७९ शाळा अ श्रेणीत आहेत.
शाळा सिध्दीतील अ श्रेणीतील शाळा...
शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत आटपाडी तालुक्यातील ९६, जत २११, कवठेमहांकाळ ७५, खानापूर ९६, मिरज १४४, पलूस ८७, शिराळा ६७, तासगाव १७९, वाळवा १५४, कडेगाव ७९ आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील ८१ शाळांचा समावेश आहे.