सांगली जिल्ह्याला १०० ई-शिवाई बसेस मिळणार; पुणे, कोल्हापूर मार्गावर धावणार
By अशोक डोंबाळे | Published: October 4, 2023 06:35 PM2023-10-04T18:35:50+5:302023-10-04T18:36:14+5:30
सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर, सांगली आणि मिरज आगाराला पहिल्या टप्प्यामध्ये खासगी कंपनीकडून १०० ई-शिवाई बसेस मिळणार आहेत. या बसेस ...
सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर, सांगली आणि मिरज आगाराला पहिल्या टप्प्यामध्ये खासगी कंपनीकडून १०० ई-शिवाई बसेस मिळणार आहेत. या बसेस पुणे, कोल्हापूर मार्गावर धावणार आहेत. या इलेक्ट्रिक बसेससाठी माधवनगर, इस्लामपूर आणि मिरज येथे चार्जिंग स्टेशन उभा करण्यात येणार असून, त्यासाठीची निविदाही निघाली आहे. येत्या तीन महिन्यांत चार्जिंग स्टेशनचे काम ठेकेदाराला पूर्ण करावे लागणार आहे.
एस.टी. महामंडळाने एस.टी.चे सध्या ५० टक्के खासगीकरण केले आहे. त्यातूनच सध्या खासगी कंपन्यांकडून बसेस घेण्यासाठी एस.टी. महामंडळाचे धोरण आहे. इलेक्ट्रिक ई-बसेसही खासगी कंपनीकडून एस.टी. महामंडळाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगली, मिरज आणि इस्लामपूर आगाराला पहिल्या टप्प्यामध्ये ई-शिवाई बसेस मिळणार आहेत. येत्या सहा महिन्यांत बसेस येणार आहेत. त्यादृष्टीने मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून प्रयत्न चालू आहेत.
माधवनगर (ता. मिरज) येथील एस.टी. महामंडळाच्या मोकळ्या दहा एकर जागेत इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग स्टेशन करण्यात येणार आहे. यासाठीची ४३ लाख २४ हजार ७४० रुपयांची निविदाही एस.टी. महामंडळाने काढली आहे. मिरज येथेही चार्जिंग स्टेशन होणार असून, त्यासाठी २७ लाख २३ हजार ८३४ रुपयांचा निधी मंजूर आहे. येथील कामाचीही निविदा प्रसिद्ध झाली असून, ठेकेदाराला तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
बसेस सहा महिन्यांत धावेल : सुनील भोकरे
ई-शिवाई बसेस इस्लामपूर, सांगली आणि मिरज आगाराला १०० मिळणार आहेत. या बसेस कोणत्या मार्गावर सोडायच्या आहेत, याचेही पूर्ण नियोजन झाले आहे. ई-शिवाई बसेसच्या चार्जिंगसाठी माधवनगर, मिरज येथे चार्जिंग स्टेशनच्या कामाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीन महिन्यांत काम पूर्ण होणार असून, येत्या सहा महिन्यांत जिल्ह्यात ई-शिवाई बसेस धावणार आहेत, अशी माहिती एस.टी. महामंडळाच्या सांगली विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.