सांगली जिल्ह्याला मिळणार १२० ई-शिवाई बसेस, धूरमुक्त होणार प्रवास
By अशोक डोंबाळे | Published: August 23, 2023 06:25 PM2023-08-23T18:25:25+5:302023-08-23T18:25:44+5:30
गाड्यांना २५० ते ३०० किलोमीटर क्षमतेची बॅटरी असणार
सांगली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हायटेक होत असून, यंत्रणा अत्याधुनिक करण्यावर भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सांगली विभागात नव्या-कोऱ्या इलेक्ट्रिकल (ई-शिवाई) बसेस प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. या बसेस शिवाई नावाने धावणार आहेत. १८० गाड्यांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, किमान १२० बसेस मंजूर होतील, असा अधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत इलेक्ट्रिकल बसेस सांगली विभागाला मिळतील. त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग पॉईंट करण्यात येत आहेत. सांगली, मिरज, इस्लामपूर बसस्थानकात दोन मुख्य चार्जिंग स्टेशन असेल. २५० ते ३०० किलोमीटर क्षमतेची बॅटरी या गाड्यांना असणार आहे. या गाड्या दोन प्रकारच्या आहेत. २५० किलोमीटर अंतरापर्यंत धावेल इतकी क्षमता असणारी बॅटरी एका गाडीला आहे. दुसऱ्या प्रकारच्या गाडीकडे तीनशे किलोमीटर अंतर धावेल इतकी क्षमता असणारी बॅटरी आहे. जिल्ह्यातील सांगली, मिरज, इस्लामपूर, जत, विटा, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी या आठ आगारांमध्ये इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी चार्जिंग पॉईंट असणार आहे. बॅटरी उतरल्यानंतर चार्जिंग करण्यासाठी प्रत्येक आगारात अत्याधुनिक सोय केली जात आहे.
खासगी कंपनीच्याच बसेस
जिल्ह्याला ई-शिवाई या नावाने १२० इलेक्टिकल बसेस मिळणार आहेत. या सर्व बसेस खासगी कंपनीकडून भाड्याने घेण्यात येणार आहेत. कंपनीला प्रति किलो मीटर ४८ रुपये भाडे असण्याची शक्यता आहे.
मुख्य कार्यालयाकडे सांगली विभागासाठी १८० इलेक्टिकल बसेसची मागणी केली आहे. त्यापैकी किमान १२० बसेस मिळण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर, जत, तासगावसह आठ आगारांना पहिल्या टप्प्यात इलेक्टिकल बसेस देण्यात येणार आहेत. त्यासाठी चार्जिंग स्टेशन करण्यात येणार आहेत. येत्या सहा महिन्यांत बसेस मिळणार आहेत. - सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ, सांगली.