सांगलीत रात्रीत सात ठिकाणी वाटमारी : टोळीचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 08:12 PM2018-03-15T20:12:30+5:302018-03-15T20:12:30+5:30
सांगली : लुटमार करणाऱ्या तिघांच्या टोळीने बुधवारी रात्री धुमाकूळ घालत चाकूच्या धाकाने दीड तासात सातजणांना लुटले.
सांगली : लुटमार करणाऱ्या तिघांच्या टोळीने बुधवारी रात्री धुमाकूळ घालत चाकूच्या धाकाने दीड तासात सातजणांना लुटले. सांगलीत सहा तर कवलापूर (ता. मिरज) येथे एक अशा या सात घटना घडल्या. टोळीने सात तोळे सोन्याचे दागिने, साठ हजाराची रोकड व तीन हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल असा तीन लाखाचा ऐवज लंपास केला.
कवलापूर येथे माळालगत मुख्य रस्त्यावर संतोष मारुती साबळे (वय २९) यांचे जय भवानी जनरल स्टोअर्स हे किराणा मालाचे दुकान आहे. रात्री साडेनऊ वाजता काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन २५ ते ३० वयोगटातील तरुण आले. एकजण रस्त्यावरच दुचाकीवर बसून होता. अन्य दोघे थेट दुकानात गेले. एकाने चाकू काढून साबळे यांच्या गळ्याला लावला, तर दुसºयाने तलवारीचा धाक दाखवून ‘तुझ्याकडे जी काही रोकड आहे, ती काढून दे, आम्ही निघून जातो’, असे सांगितले. यावर साबळे यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एकाने गल्ल्यात हात घालून १६ हजाराची रोकड काढून घेतली. साबळे यांनी आरडाओरड केल्यानंतर दुसºयाने त्यांच्या हातावर व मांडीवर तलवारहल्ला केला.
माधवनगर रस्त्यावर संपत चौकात देशी दारुचे दुकान आहेत. या दुकानातील कामगार मंजुनाथ पिरसंगप्पा (३१) हा दुकान बंद करुन त्याच्या शेजारील एका खोलीत झोपण्यासाठी गेला. तेवढ्यात त्याचा मित्र महिंद्र अरविंद कांबळे (३०, रा. पंचशीलनगर) हा आल्याने दोघे बोलत बसले होते. तिघांच्या टोळीने खोलीचा दरवाजा ठोठावला. दारु पिण्यास ग्राहक आले असेल, असा अंदाज करुन मंजूनाथने दरवाजा उघडला. त्यानंतर तिघेही खोलीत शिरले अन् त्यांनी मंजूनाथ व मित्र महिंद्रला गळ्याला चाकू लावला. दोघांच्या गळ्यातील सोन्याची चेन व बदाम तसेच मंजूनाथकडील दारु व्यवसायातील ४२ हजाराची रोकड लंपास केली. या घटनेनंतर तिघेही पंचशीलनगरमध्ये गेले. तेथील चौकातील अशोक रंगराव खराडे त्यांच्या किराणा मालाच्या दुकानाबाहेर कटट्यावर बसले होते. तिघांनी त्यांना चाकूच्या धाक दाखवून साडेसहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. याच मार्गावरुन निलेश दत्तात्रय ढोबळे (३२, पंचशीलनगर) हा दुचाकीवरुन घरी निघाला होता. टोळीने त्याच्याकडील २३ हजाराचा मोबाईल लंपास केला.
पंचशीलनगरमध्ये लुटमार करण्यापूर्वी टोळी शंभरफुटी रस्त्यावरील फिरली. किसान चौकातील सुधीर शिवलींग सगरे (४६) हे औषधे आणण्यासाठी दुचाकीवरुन शंभरफुटी रस्त्यावरील दिगंबर मेडिकलमध्ये गेले होते. औषधे घेतल्यानंतर ते घरी निघाले होते. तिघांनी त्यांचा पाठलाग करुन दुचाकी आडवी मारुन थांबविले. त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे चेन काढून घेतले. काही अंतरावर गेल्यानंतर तिघांनी चालत निघालेल्या विद्यासागर महावीर आवटे (३५, रा. त्रिकोणी बागेजवळ, सांगली) हा तरुणास अडवून त्याच्याकडील बाराशे रुपये काढून घेतले. या सर्व घटनांची सांगली शहर, संजयनगर व सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
टोळी पुन्हा सक्रिय :
गेल्या दोन महिन्यापासून तिघांची टोळी तलवार व चाकूचा धाक दाखवून लूटमार करीत आहे. आठवड्यापासून हे प्रकार थांबले होते. पण सांगलीत कवलापूरला रात्रीत सात ठिकाणी या घटना घडल्याने भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूरला अशाचप्रकारे लूटमार करणाºया सहाजणांच्या टोळीस पकडण्यात यश आले आहे. परंतु सांगली परिसरात तीन ‘डझन’हून अधिक गुन्हे झाले तरी पोलिसांना या टोळीचा सुगावा लागलेला नाही.
टोळीचा पोलिसांना गुंगारा
सातही घटनामध्ये तिघांची टोळी आहे. ते २५ ते ३० वयोगटातील आहे. त्यांनी काळ्या रंगाची दुचाकी वापरली होती. कवलापूरला प्रथम लुटीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी या भागात नाकाबंदी केली. तेवढ्यात शंभरफुटी रस्त्यावर दोन घटना घडल्यानंतर पोलीस तिकडे गेले. संपत चौक व पंचशीनगरमध्येही चार घटना घडल्याचे समजाच पोलीस चक्रावून गेले होते. पहाटेपर्यंत शहरात नाकाबंदी करुन तिघांचा शोध सुरु होता. पण पोलिसांना गुंगारा देण्यात ही टोळी पुन्हा एखदा यशस्वी झाली आहे.