सांगलीत एसटीच्या ताफ्यात नव्या 'लालपरी' दाखल, दहा वर्षांनंतर मिळाल्या १० एसटी बस
By अशोक डोंबाळे | Published: March 13, 2023 06:43 PM2023-03-13T18:43:15+5:302023-03-13T18:51:05+5:30
प्रवाशांना होणार फायदा : ठेकेदाराच्या १०० बस सोमवारी येणार
सांगली : एसटी महामंडळाला कोरोनाकाळात मागील दोन वर्षे अतिशय खडतर गेले आहेत. कमी आणि कालबाह्य बसमुळे एसटी महामंडळाच्या सेवेवरही परिणाम झाला होता. आता काही दिवसांपासून एसटी सेवा सुरळीतपणे सुरू झाली आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या सांगली विभागाला चक्क दहा वर्षांनंतर प्रथमच १० लालपरी मिळाल्यामुळे कर्मचारी खुश झाले आहेत, तसेच ठेकेदाराच्या १०० बस दि. २० मार्चला मिळणार आहेत.
गेल्या दहा वर्षांत एसटी महामंडळात नवीन एसटी बस दाखल होत नव्हत्या. जुन्या बसची अवस्था अतिशय वाईट झाली होती. या सर्व बाबी लक्षात घेत एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यामध्ये सांगली विभागाला महामंडळाच्या मालकीच्या नवीन दहा बस मिळाल्या आहेत.
मिरज आगारालाही दहा नवीन बस मिळणार आहेत. याचबरोबर ठेकेदाराकडून सांगली विभागाला १०० बस मिळणार आहेत. या बस पुरवठा करण्याबाबत ठेकेदाराला आदेश दिले आहेत. त्यानुसार ठेकेदाराकडून दि. २० मार्चला १०० बस मिळणार आहेत. यापैकी विटा आगारला २५, जत २५, कवठेमहांकाळ २५ आणि तासगाव आगाराला २५ बस मिळणार आहेत.
अशी असणार नवीन बस
बसमधील सीट पुशबॅक व बकेट पद्धतीची, प्रवाशांसाठी खिडकीच्या उंचीत वाढ, बसचा दरवाजा ऑटोमेटिक, बसमध्ये इमर्जन्सी बटन, प्रवाशांच्या मोबाइल चार्जिंगची सोय, बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनाउन्स सिस्टम, बसमध्ये ४६ प्रवासी प्रवास करू शकतात.
६० स्क्रॅप बसचा लिलाव
महामंडळाच्या सांगली विभागातील ६० बस या स्क्रॅप झाल्या आहेत. १३ वर्षांहून अधिक काळ या बसचा वापर झाला असून, त्या सध्या कालबाह्य झाल्या आहेत. या बसचा लिलाव काढण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
सांगली विभागातील बसची सद्य:स्थिती
साध्या बस - ५५८
साधी परिवर्तन - २०
शहरी बस - ४८
रातराणी - १४
एकूण - ६७८
शिवशाही - ३८
एसटी बसची संख्या खूपच कमी असल्यामुळे प्रवासी वाहतुकीत अडचणी येत होत्या. म्हणून नवीन बसची मागणी केली होती. त्यानुसार महामंडळाच्या मालकीच्या २० लाल बस मंजूर असून त्यापैकी सांगली आगाराला दहा मिळाल्या आहेत. मिरज आगाराला लवकर मिळणार असून विटा, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आगाराला प्रत्येकी २५ बस ठेकेदाराकडून मिळणार आहेत. २० मार्चपर्यंत बस येणार आहेत. -अरुण वाघाटे, यंत्र अभियंता