सांगली : अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:54 PM2018-07-03T14:54:08+5:302018-07-03T14:57:09+5:30
सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
सांगली : राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत.
लहान मुलांना पळवून त्यांच्याकडून भीक मागविली जाते किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पसरविण्यात येत आहेत. त्यातून धुळे, मालेगाव या भागात काही ंहिंसक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
केवळ संशयावरून कायदा हातात घेणे आणि निष्पाप व्यक्तींचा छळ करणे हा गुन्हा आहे. धुळे, मालेगाव या ठिकाणी संशयावरून हिंसक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची कोणतीही घटना जिल्ह्यात घडली नाही तसेच यापुढेही घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सर्तकतेचे निर्देश देण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी नागरिकांनीही तथ्यहीन घटनांवर विश्वास ठेवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करून तसेच जनतेने अफवा पसरविणाऱ्यांबाबत सर्तक व संवेदनशिल राहावे व कोणताही अनुचित प्रकार समोर आल्यास त्वरित 100 नंबरवर संपर्क साधावा अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.