सांगली : ‘वंचित बहुजन’चा गाढव मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:34 PM2019-05-21T23:34:10+5:302019-05-21T23:34:57+5:30
सांगली : दुष्काळी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात, दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात चारा छावणी सुरू करावी, उपसा सिंचन ...
सांगली : दुष्काळी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात, दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात चारा छावणी सुरू करावी, उपसा सिंचन योजना अखंडित चालू ठेवून त्यांचे सर्व वीज बिल टंचाई निधीतून भरावे, यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी तसेच जनतेच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली गाढव मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. कार्यकर्ते गाढवे घेऊन मोर्चात सहभागी झाल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गाढव, घोडा, शेळ्या-मेंढ्या यांच्यासाठी त्वरित चारा छावण्या चालू कराव्यात, इतर जनावरांप्रमाणे त्यांना अनुदान द्यावे, चारा छावण्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात गाव तिथे चारा छावणी सुरू करावी, छावण्या सुरू करण्याबाबतच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, टेंभू, म्हैसाळ, ताकारी आणि आरफळ या उपसा सिंचन योजनांची आवर्तने निश्चित करून पाणी द्यावे, या योजनांमधील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप थांबवावा, दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, टँकरची सुविधा देण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तलाव, विहिरींत म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजनांचे पाणी सोडावे, आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
विश्रामबाग चौकातील विलिंग्डन महाविद्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली.
यावेळी ‘आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा देत फलक हाती घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मोर्चात तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. डॉ. सुदर्शन घेरडे, डॉ. विवेक गुरव, अमोल वेटम, निवांत कोळेकर, नानासाहेब वाघमारे, आश्रफ वानकर, महेश कांबळे, टिपू इनामदार, करिम मुजावर, मुनीर मुल्ला, बाळासाहेब रास्ते, संजय कांबळे, शिवाजी पवार, विनायक रुपनर, आनंदराव म्हारगुडे, पिंटू माने, राहुल मदने आदी उपस्थित होते.
दुष्काळ सरकारच्या नाकर्तेपणामुळेच : गोपीचंद पडळकर
जनावरांसाठी चारा छावण्या आणि लोकांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळत नाहीत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मोर्चावेळी केली. माणसांचे मोर्चे काढून सरकार ऐकत नाही, त्यामुळे गाढवांचा मोर्चा काढण्यात आला आहे. जत, आटपाडी तालुक्यात वीस दिवसांनी टँकर मिळतात. प्रशासनाचे नियोजन नसून, ते हतबल झाले आहे. दुष्काळी योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.