सांगली : प्रारूप मतदार याद्या प्रसिद्धीमध्ये घोळ; याद्याच प्रसिद्ध झाल्या नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:44 AM2018-06-06T11:44:42+5:302018-06-06T11:44:42+5:30
सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांकडे लक्ष लागून राहिलेल्या इच्छुकांच्या पदरी मंगळवारी निराशाच आली. प्रशासनाने प्रारुप मतदार याद्याच मंगळवारी प्रसिद्ध केल्या नाहीत. तांत्रिक कारणामुळे याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब होणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे प्रारुप मतदार याद्या प्रसिद्धीला विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांकडे लक्ष लागून राहिलेल्या इच्छुकांच्या पदरी मंगळवारी निराशाच आली. प्रशासनाने प्रारुप मतदार याद्याच मंगळवारी प्रसिद्ध केल्या नाहीत. तांत्रिक कारणामुळे याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब होणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे प्रारुप मतदार याद्या प्रसिद्धीला विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली होती. गेल्या पंधरा दिवसात सर्वच पक्षांतील इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालविला आहे. राजकीय पक्षांनीही विविध कार्यक्रम, विकास कामांच्या उद््घाटनाचा सपाटा लावला आहे.
इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागविले जात आहेत. त्यातच इच्छुकांचे प्रारुप मतदार यादीकडे लक्ष लागले होते. राज्य निवडणूक आयोगाने गेल्याच आठवड्यात मतदार याद्या प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवारी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. त्यामुळे सकाळपासून इच्छुक उमेदवारांकडून मतदार याद्यांबाबत विचारपूस होत होती.
दुपारपर्यंत मतदार याद्या प्रसिद्ध न झाल्याने इच्छुकांच्या हृदयाचे ठोकेही वाढले होते. आपापल्यापरीने इच्छुकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मतदार यादीबाबत विचारणाही केली. सायंकाळपर्यंत यादी प्रसिद्ध होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. पण अखेर मंगळवारी प्रारुप मतदार याद्याच प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत.
याबाबत आयुक्त रवींद्र खेबूडकर व उपायुक्त सुनील पवार यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक कारणामुळे मतदार यादी प्रसिद्धीला विलंब लागणार असल्याचा खुलासा करण्यात आला.
ते म्हणाले की, महापालिका प्रशासनाने २१ मेपर्यंत अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य धरून प्रभागनिहाय विभागणी केली. ही यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे.
या प्रारुप यादीतील दुबार नावे वगळण्याचे काम आयोगाच्या स्तरावर सुरू आहे. त्यासाठी मतदार यादीची आॅनलाईन सॉफ्टवेअरद्वारे तपासणी केली जात आहे. या तपासणीला विलंब लागत असल्याने आयोगाकडून प्रारुप यादी प्राप्त झालेली नाही.
सायंकाळपर्यंत केवळ तीन प्रभागांची यादी प्राप्त झाली होती. अजून १७ प्रभागांची यादी तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मतदार यादी प्रसिद्धीला विलंब लागण्याची शक्यता आहे. या याद्या आयोगाकडून तपासणी होऊन आल्यानंतर प्रसिद्ध केल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले.