सांगली : ड्रेनेज ठेकेदाराला आठ दिवसांचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 03:54 PM2018-06-25T15:54:07+5:302018-06-25T15:55:51+5:30
सांगली महापालिकेच्या ड्रेनेज ठेकेदार एसएमसी कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपासून काम बंद ठेवल्याबद्दल बुधवारी महासभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. ठेकेदार काम करण्यास तयार नसेल तर, ठेका रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी झाली. अखेर ठेकेदाराला काम सुरू करण्याची आठ दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर त्याचा ठेका रद्द करण्याचा ठरावही संमत करण्यात आला.
सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज ठेकेदार एसएमसी कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपासून काम बंद ठेवल्याबद्दल महासभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. ठेकेदार काम करण्यास तयार नसेल तर, ठेका रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी झाली. अखेर ठेकेदाराला काम सुरू करण्याची आठ दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर त्याचा ठेका रद्द करण्याचा ठरावही संमत करण्यात आला.
शिवसेनेचे नेते नगरसेवक शेखर माने यांनी सभेत पॉर्इंट आॅफ आॅर्डरखाली ड्रेनेज प्रकल्पावर चर्चा घडवून आणली. माने म्हणाले की, महिन्याभरापासून एसटीपीचे काम बंद आहे. शहरातील मैलामिश्रित पाणी नदीत मिसळत आहे. खणभाग, नळभागासह गावठाणातील सांडपाणी रस्त्यावर आले आहे. महापालिका व नागरिकांना ड्रेनेज ठेकेदार वेठीस धरत आहे.
गेली सहा वर्षे भाववाढ दिली जाते. दोन मीटरने खुदाईचा नियम असताना ७ मीटर खुदाईचे बिल काढले जात आहे. ठेकेदाराचे बिल तपासण्याची तसदीही घेतली जात नाही. करारपत्रातील कलम ३८ नुसार बिले अदा करण्यात आलेली नाहीत. ठेकेदार काम करणार नसेल तर स्वतंत्र यंत्रणेमार्फत योजना पूर्ण करावी, असेही ते म्हणाले.
मध्यंतरी प्रशासनाने एक कोटीचा दंड माफ करण्याचा घाट घातला होता; पण तो आम्ही उधळून लावला. ११४ कोटींची मूळ योजना असून, ठेकेदाराला ९० कोटी रुपये दिले आहेत. राजा उदार झाला असून, जनतेचा कररूपी पैसा संपत चालला आहे. त्यामुळे भविष्यात ही योजना अर्धवट राहण्याची शक्यता आहे. शामरावनगर वगळता इतर ठिकाणी साधी कुदळही मारलेली नाही. ठेकेदाराला अंतिम नोटीस देऊन तो काम करण्यास तयार नसेल तर ठेका रद्द करावा, अशी मागणी माने यांनी केली.
गटनेते किशोर जामदार यांनी मिरजेतील ड्रेनेजचा प्रश्न मांडला. प्रशासनाने एसटीपी पूर्ण नसताना वाहिन्या कार्यान्वित केल्या आहेत. सांडपाणी एका ओढ्याला सोडले आहे. त्यामुळे रोगराई पसरत चालल्याचे निदर्शनास आणून दिले. राजेश नाईक यांनी खणभागात सांडपाणी रस्त्यावर येत असल्याचे सांगितले. प्रशांत मजलेकर यांनी सध्याच्या ठेकेदाराचे काम थांबवून दुसऱ्याला काम देण्याची मागणी केली.
उपायुक्त सुनील पवार म्हणाले की, ठेकेदार संथगतीने काम करीत असल्याने त्याचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला होता; पण अपरिहार्य कारणांमुळे प्रशासनाने पुन्हा याच ठेकेदारांकडून काम करून घेण्याचा निर्णय घेतला. तो काम करण्यास तयार नसेल, तर त्याच्याकडून काम काढून घ्यावे लागेल. त्यासाठी शासनस्तरावर चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत मांडले. अखेर महापौर हारुण शिकलगार यांनी ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी आठ दिवसांच्या मुदतीची नोटीस प्रशासनाने द्यावी. त्यानंतर त्याने काम सुरू न केल्यास नवीन ठेकेदार नियुक्त करून योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
२० कोटींची जादा उधळपट्टी
ड्रेनेज ठेकेदाराने २ मीटरऐवजी ७ मीटरने खुदाई केली आहे. त्याचे जादा बिल महापालिकेकडून वसूल केले आहे. करारपत्रातील कलम ३८ नुसार बिले अदा करण्यात आलेली नाहीत. त्याच्या एका बिलात ६२ लाखांची जादा रक्कम निघाली आहे. आतापर्यंत सांगलीतून २४, तर मिरजेतून २२ बिले अदा केली आहेत. या साऱ्या बिलांची फेरतपासणी केल्यास ठेकेदाराला २० कोटी रुपयांची जादा रक्कम दिल्याचे दिसून येते. प्रशासन ठेकेदारावर उदार असल्याने ही उधळपट्टी झाल्याचा आरोप शेखर माने यांनी केला.