सांगली - विद्यमान १८ नगरसेवक भाजपच्या वाटेवर : स्थानिकांसह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:27 AM2018-02-09T01:27:45+5:302018-02-09T01:27:45+5:30

 Sangli - Existing 18 Corporators on BJP: Discussions with local leaders and senior leaders | सांगली - विद्यमान १८ नगरसेवक भाजपच्या वाटेवर : स्थानिकांसह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा

सांगली - विद्यमान १८ नगरसेवक भाजपच्या वाटेवर : स्थानिकांसह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा

Next

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच काही विद्यमान नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास उमेदवारीचा गुंता वाढणार आहे. त्यामुळे काहीजणांनी भाजपशी संपर्क वाढविला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने या नगरसेवकांची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घडवून आणली आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले असले तरी, अद्याप सांगली महापालिकेवर मात्र झेंडा फडकविता आलेला नाही. महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला आहे. यंदा भाजपने महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. गेल्या वर्षभरापासून नियोजनबद्धरित्या भाजपची वाटचाल सुरू आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ३३ कोटींचा निधी आणून विकास कामांना गती दिली आहे. भाजपची ही खेळी लक्षात घेऊन काँग्रेसनेही २४ कोटींच्या विशेष निधीतून शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण हाती घेतले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने शहरातील मुख्य रस्त्यांचे काम हाती घेतले, तर भाजपने गल्ली-बोळातील रस्त्यांसह काही मुख्य रस्त्यांचा प्रश्न निकाली काढला आहे.

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी महापालिका निवडणुकीची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील यांच्या साथीने महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. पण भाजपकडे इलेक्शन मेरीट असलेल्या उमेदवारांची वानवा आहे. त्यामुळे भाजपला इतर पक्षांतील इनकमिंगवरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागले आहे.

काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्रीनगर येथील आयोजित कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी आघाडीची गरज बोलून दाखविली. दुसरीकडे काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही आघाडीचा सूर आळवला आहे. प्रत्यक्षात यासंदर्भातील अधिकृत निर्णय जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेनंतरच होणार आहे.


प्रवेशाचा मुहूर्त : प्रभाग रचनेनंतरच
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. येत्या २० मार्च रोजी प्रभाग रचना व आरक्षण सोडत आहे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पक्ष अदलाबदलीला वेग येईल. या अठरा नगरसेवकांनीही प्रभाग रचनेनंतरचाच मुहूर्त काढला आहे. त्यात भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी विद्यमान नगरसेवकांना प्रवेश देण्यास विरोध सुरू केला आहे. या नगरसेवकांच्या कारभारामुळेच पालिकेतील सत्ताधारी बदनाम झाले आहेत. त्यांना भाजपमध्ये घेऊन बदनामी कशासाठी करून घ्यायची? असा युक्तिवादही केला जात आहेत.

कॉँग्रेसचे सहा, राष्टÑवादीचे बारा
दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास विद्यमान काही नगरसेवकांच्या उमेदवारीचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. प्रत्येक वॉर्डात काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यामुळे काही विद्यमान नगरसेवकांनी भाजपशी संपर्क वाढविला आहे. भाजपच्या व्यासपीठावरही ही मंडळी दिसू लागली आहेत. सध्या काँग्रेसमधील ६ व राष्ट्रवादीतील १२ नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

चर्चा वरिष्ठ नेत्यांशी
काँग्रेसमधून निवडून आलेल्या मिरजेच्या तीन नगरसेवकांनी तर गेल्या काही दिवसांपासून सवतासुभा मांडला आहे. या तीन नगरसेवकांचे भाजपशी पूर्वीपासूनच जुळते. त्यात सांगलीतील काँग्रेसमधील आणखी तिघांचा समावेश झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगरसेवकांत दोन गट आहेत. त्यातील एक गट भाजपच्या वाटेवर आहे. या नाराज नगरसेवकांची मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्याला मिरजेतील एका बड्या नगरसेवकानेही दुजोरा दिला आहे.

Web Title:  Sangli - Existing 18 Corporators on BJP: Discussions with local leaders and senior leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.