सांगली : ऊसबिलाचे तुकडे केल्याच्या निषेधार्थ बहेत ऊसबिलाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:37 PM2019-01-14T17:37:50+5:302019-01-14T17:39:38+5:30
बहे (ता. वाळवा) येथे साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊसबिलाचे तुकडे केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर कारखानदार व शासनाविरोधात निषेध फेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करीत ऊस बिलाची होळी केली.
शिरटे : बहे (ता. वाळवा) येथे साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊसबिलाचे तुकडे केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर कारखानदार व शासनाविरोधात निषेध फेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करीत ऊस बिलाची होळी केली.
परिसरातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील नोव्हेंबरअखेर तुटलेल्या उसाचे बिल नुकतेच बँकेत जमा केले आहे. हे बिल एफआरपीनुसार दिले नसल्याने शेतकऱ्यांनी शासन व कारखानदारांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत गावातून निषेध फेरी काढली.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर शासनाच्या धोरणाचा निषेध करीत उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. निषेध फेरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष शहाजी पाटील, तालुका उपाध्यक्ष सुरेश पाटील, विलास पाटील, प्रवीण पाटील, प्रताप थोरात, मधुकर बावचकर, दशरथ यादव, प्रकाश पाटील, आर. पी. पाटील, शामराव जगताप, हुसेन शेख आदी सहभागी झाले होते.
साखर कारखान्यांनी कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे तुकडे झालेले बिल आम्ही स्वीकारणार नाही. आता जर ८० टक्केप्रमाणे पैसे घेतले तर, पुढचे पैसे मिळणे मुश्किल होणार आहे. आपल्या हक्काची एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
शहाजी पाटील, जिल्हाउपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.