कोरोना रिकव्हरीत सांगली पंचमस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:54 AM2020-12-11T04:54:48+5:302020-12-11T04:54:48+5:30
सांगली : जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असून, रुग्ण बरे होण्याच्याबाबतीत जिल्हा सध्या राज्यात पाचव्या स्थानी आहे. कोल्हापूरही सांगलीसह ...
सांगली : जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असून, रुग्ण बरे होण्याच्याबाबतीत जिल्हा सध्या राज्यात पाचव्या स्थानी आहे. कोल्हापूरही सांगलीसह संयुक्तरित्या पाचव्या स्थानी आहे. भंडारा जिल्हा यादीत सर्वात शेवटच्या स्थानी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या कोविड डॅशबोर्डवर दररोज जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली जात आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार सांगली जिल्हा कोरोना रिकव्हरी प्रमाणाच्याबाबतीत पाचव्या स्थानी आला आहे. राज्यात धुळे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा सध्या ९६.४ टक्के इतका असून, त्याखालोखाल नाशिक, औरंगाबाद व पालघर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. चार जिल्ह्यांचा दर हा ९६ टक्क्यांवर आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात चांगला कोरोना रिकव्हरी रेट हा सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यासाठी ही चांगली बाब आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, तर सांगली, कोल्हापूरनंतर सोलापूर, पुणे, सातारा यांचा क्रमांक लागलो.
सांगली जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोना नियंत्रणात आणताना कसरत करावी लागली. उपचाराअभावी येथील अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला, मात्र सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी कोविड रुग्णालये उभारल्यानंतर उपचारासाठी धावाधाव थांबली. योग्यवेळी योग्य उपचार मिळाल्याने सांगली जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्हा राज्याच्या पटलावर कोरोनामुक्तीच्या दिशेने गतीने वाटचाल करीत आहे. कोरोना रुग्णवाढीचा दरही दिवसेंदिवस कमी होत आहे.
चाैकट
सक्रिय रुगणांच्या तुलनेत सांगली मागे
पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास पाचही जिल्ह्यात सक्रिय रुग्णांबाबत सांगली हा सर्वात शेवटी आहे. ही बाब समाधानाची आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा विचार केल्यास हिंगोली, परभणी, धुळे, पालघर, वाशिम, सिंधुदुर्ग हे जिल्हे सांगलीच्या मागे आहेत. या यादीत सांगली शेवटून सातव्या स्थानी आहे.