सांगली पूर: पहिला सेल्फी, नंतर उपरती; अखेर गिरीश महाजन पाण्यात उतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:17 PM2019-08-09T15:17:59+5:302019-08-09T15:19:39+5:30
विरोधी पक्षातील नेत्यांनी घरात बसण्यापेक्षा बाहेर पडावं
सांगली - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याआधी जात असलेल्या बोटीतून सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पुराचं कोणतंही गांभीर्य मंत्र्यांना नाही अशी टीका झाल्यानंतर अखेर गिरीश महाजन यांनी पाण्यात उतरुन गेल्या 4 दिवसांपासून मदत न झालेल्या सांगली येथील पूरग्रस्त गावात पोहचले.
मात्र विरोधी पक्षांकडून टीका होत असल्याने त्यांनी ट्विट करुन मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी घरात बसण्यापेक्षा बाहेर पडावं. टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावं असा टोला लगावला आहे.
गेल्या ४ दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज पोहोचलो.
— Girish Mahajan (@girishdmahajan) August 9, 2019
मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे! #maharashtrafloods#MaharashtraRains#Kolhapurfloodspic.twitter.com/oA7tvnbEAh
भारतीय सैन्यदलाच्या मदतीने गिरीश महाजन हे पूरग्रस्त गावात पोहचले. तेथे अडकलेल्या गावकऱ्यांना रेस्क्यू केलं. मात्र या आधी महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली होती. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेल्या गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा अविर्वावात फिरताना दिसत होते. गिरीश महाजन यांच्योसोबत काही कार्यकर्ते आणि पोलीसही या बोटीवर असल्याचे दिसून येत होते.
त्यामुळे धनंजय मुंडे, जयंत पाटील, राज ठाकरे यांनी गिरीश महाजनांच्या या प्रकारावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून महाजन यांना खडे बोल सुनावले होते. सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! 'त्या' लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय मात्र सेल्फी काढण्यात मग्न आहेत. यांना लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री या संवेदनशील वागण्याची दखल घेणार का?, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला होता.
कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती पाहून अवघा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. त्यातच, सांगलीतील बोट दुर्घटनेत जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांचे स्थलांतर झाले आहे. पूरग्रस्त लोकांना राज्यभरातून मदत पुरविण्यात येत असून अन्न आणि निवाऱ्याची सोय करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देत, पूरस्थितीची हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बचत आणि मदतकार्य जोमाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.