सांगली पूर: पूरग्रस्तांना वाचविणारी बोट उलटली; 14 जणांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:57 PM2019-08-08T12:57:08+5:302019-08-08T14:56:59+5:30
या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
सांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या ३२ नागरिकांना बाहेर काढत असताना नाव पलटी झाली असून नावेतील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह सापडले असून इतर १६ जणांचा शोध सुरु आहे. ब्रह्मनाळ येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो. सध्या कृष्णा नदीला महापूर आला असून ब्रह्मनाळ येथे नदीचे पात्र अक्राळविक्राळ बनले आहे. संपूर्ण ब्रह्मनाळ गावाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला असून, गावात तीन दिवसांपासून पाणी आहे.
गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या नावेतून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात येत होते. नावेत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ३२ जण बसले होते. नाव कडेने गावाबाहेर जात असताना नावेचा पंखा पाण्यातील झाडात आणि पाईपमध्ये अडकला. नावेतील वाढलेले वजन आणि पंखा अडकल्याने नाव उलटली. पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने नावेतील कोणालाच काहीही करता आले नाही. पोहता येणारे दोघेजण पाण्यात झाडाझुडपांना धरून राहिले. मात्र इतरजण बुडाले. बत्तीसपैकी १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी काही पाण्याबरोबर वाहून जाऊन कडेला अडकले होते.
आणखी 16 जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू
स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय पथक बचावकार्यात सहभागी आहे. घटनास्थळी आक्रोश आणि गोंधळ सुरू आहे. गावात आणखी २०० ग्रामस्थ अडकून पडले असून, त्यांच्यासाठी बोटींची सोय अजूनही करण्यात आलेली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर, सातारा, सांगलीत पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सुमारे 15 हजार 836 कुटुंबांतील 82 हजार 405 लोक व 22 हजार 258 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील 19 गावांतील 3 हजार 911 कुटुंबांतील 20 हजार 898 लोक व 5 हजार 883 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 22 गावांतील 4 हजार 565 कुटुंबांतील 21 हजार 32 लोक व 5 हजार 828 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 32 गावांतील 6 हजार 142 कुटुंबांतील 30 हजार 659 लोक व 7 हजार 799 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 17 गावांतील 311 कुटुंबांतील 1 हजार 399 लोक व 2 हजार 305 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 8 हजार 417 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.