सांगली पूर: खेराडे-विटा, भिकवडीतील गावकऱ्यांनी दिला पुरग्रस्तांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:45 PM2019-08-08T12:45:32+5:302019-08-08T13:16:53+5:30

जिल्ह्यातील सुमारे 15 हजार 836 कुटुंबांतील 82 हजार 405 लोक व 22 हजार 258 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे

Sangli Flood: Villagers in Kherade-Vita, Bhikavadi provide help to the affected people of flood | सांगली पूर: खेराडे-विटा, भिकवडीतील गावकऱ्यांनी दिला पुरग्रस्तांना मदतीचा हात

सांगली पूर: खेराडे-विटा, भिकवडीतील गावकऱ्यांनी दिला पुरग्रस्तांना मदतीचा हात

Next

सांगली - मागील काही दिवसांपासून सांगलीत सुरु असणाऱ्या पावसामुळे मिरज, पलूससह अन्य तालुक्यांना पुराचा फटका बसला आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णानदीची पाणी पातळी 56 फूट 8 इंच झाली आहे. अनेक उपनगरामध्ये पुराचे पाणी शिरलेले आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सांगलीतील खेराडे-विटा, भिकवडी या गावातील लोकांनी पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांना लागणारं जीवनावश्यक साहित्य गावकऱ्यांनी पाठवलं आहे. यामध्ये भाकरी, चपाती, भाजी, कोलगेट,तेल, तांदूळ, गरा, फरसाण, बिस्कीटे असं साहित्य पुरग्रस्तांना पाठविण्यात आलं आहे. 

पुरात अडकलेल्या लोकांच्या सोयीसाठी मिरजेहून आजपासून 3 दिवस एक विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. आज दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी ही गाडी कराडला 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. हीच गाडी कराडहून दुपारी 2 वाजता मिरजेकडे रवाना होईल. 

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वोतोपरी  प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सुमारे 15 हजार 836 कुटुंबांतील 82 हजार 405 लोक व 22 हजार 258 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), टेरिटोरियल आर्मी, कोल्हापूर, पुणे-चिंचवड महानगरपालिका पथक अशा पथकांना पाचारण करण्यात आले असून, यामध्ये 211 जवानांचा समावेश आहे. ही पथके इस्लामपूर - वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यात बचाव कार्य करत आहेत. 

शिराळा तालुक्यातील 17 गावांतील 311 कुटुंबांतील 1 हजार 399 लोक व 2 हजार 305 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 8 हजार 417 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.  मिरज तालुक्यातील बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज, वाळवा तालुक्यातील शिरगाव, भरतवाडी, पलूस तालुक्यातील भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदी तर्फे वाळवा, पुणदीवाडी, अनुगडेवाडी, अमणापूर, चोपडेवाडी, खटाव, ब्रम्हनाळ या गावांचा संपर्क तुटला असून स्थलांतरण सुरू आहे.

मिरज तालुक्यातील 19 गावांतील 3 हजार 911 कुटुंबांतील 20 हजार 898 लोक व 5 हजार 883 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 22 गावांतील 4 हजार 565 कुटुंबांतील 21 हजार 32 लोक व 5 हजार 828 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 32 गावांतील 6 हजार 142 कुटुंबांतील 30 हजार 659 लोक व 7 हजार 799 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. 

Web Title: Sangli Flood: Villagers in Kherade-Vita, Bhikavadi provide help to the affected people of flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.