सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबांच्या पुतळ्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:20 PM2018-08-14T17:20:35+5:302018-08-14T17:26:01+5:30
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीस शासनाने मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ पणन संचालकांनी पुतळा उभारणीच्या खर्चाला सोमवारी मान्यता दिली.
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीस शासनाने मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ पणन संचालकांनी पुतळा उभारणीच्या खर्चाला सोमवारी मान्यता दिली. त्यामुळे लवकरच पुतळ्याचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती रवी पाटील आणि संचालक अजित जाधव यांनी दिली.
तासगाव बाजार समितीचा लौकिक राज्यभर पोहोचवण्यात आणि देशभरात बेदाणा मार्केटमध्ये तासगावचे नाव करण्यात आबांचे मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर बाजार समितीच्या आवारात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव बाजार समितीतर्फे २५ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आला होता. त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
शासनाकडून ४ आॅगस्ट रोजी पुतळा उभारणीस मंजुरी दिली. त्यानंतर पुतळा उभारणीसाठीच्या खर्चास परवानगी मिळण्याबाबत पणन संचालकांकडे प्रस्ताव सादर केला होता. सोमवारी पणन संचालकांकडून २९ लाख ३ हजार ९६८ रुपये खर्चास मंजुरी देण्यात आल्याची माहिती सभापती पाटील आणि संचालक जाधव यांनी दिली.
आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या प्रयत्नामुळे आणि संचालक मंडळाच्या पाठपुराव्यामुळे पुतळा उभारणीसाठी आवश्यक ती सर्व मंजुरी मिळाली असून लवकरच पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती यावेळी दिली.