Sangli: सांगलीत जादा परताव्याच्या आमिषाने चौघांना ३७ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल
By शरद जाधव | Published: October 22, 2023 09:10 PM2023-10-22T21:10:52+5:302023-10-22T21:11:09+5:30
Sangli News: कंपनीत गुंतवणूक केल्यास दहा महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांना ३६ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा गंडा घालण्यात आला.
- शरद जाधव
सांगली - कंपनीत गुंतवणूक केल्यास दहा महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांना ३६ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी आण्णासाहेब बाळासाहेब जगताप (रा. झुरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) यांनी महादेव पांडुरंग जाधव (रा. वरळी,मुंबई) आणि अरबाज जमीर सनदी (रा. घाटगे हॉस्पिटलजवळ, सांगली) यांच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
८ मार्च ते २१ ऑक्टोबर या कालावधीत हा प्रकार घडला. यातील संशयितांनी रेहान एंटरप्रायजेस आणि अतुल्य मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले होते. शहरातील घनश्यामनगर येथील वरद शिव अपार्टमेंटमध्ये त्यांनी कार्यालय सुरू केले होते. फिर्यादी जगताप यांना संशयितांनी दोन्ही कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी १७ लाख ५३ हजार ६०० रुपयांची गुंतवणूक केली होती. या बदल्यात कंपनीच्यावतीने त्यांनी लेखी ॲग्रीमेंट आणि पुढील तारखेचे धनादेश त्यांना दिले होते. यातील दोन लाख ९० हजार रुपयांचा परतावाही त्यांना देण्यात आला होता.
यानंतर १४ लाख ६३ हजार ६०० रुपयांची मुद्दल अथवा परतावाही न देता संशयितांनी कंपनीचे कार्यालय बंद करून ते निघून गेले होते. जगताप यांच्यासह अशोक नारायण पाटील पाच लाख ४० हजार, विलास सुखदेव शिंदे १३ लाख रुपये आणि शुभांगी मनोजकुमार पाटील यांची तीन लाख ६५ हजार अशी ३६ लाख ६८ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच जगताप यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.