सांगली पुराच्या विळख्यातून मुक्त; स्थलांतरित नागरिकांना दिलासा, महापालिकेकडून स्वच्छता सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 11:53 AM2024-08-08T11:53:04+5:302024-08-08T11:53:31+5:30
सांगली : बारा दिवसांपासून पुराच्या विळख्यात असलेल्या सांगली शहरातील नागरी वस्त्या बुधवारी पहाटे मुक्त झाल्या. महापालिकेने तातडीने पूर येऊन ...
सांगली : बारा दिवसांपासून पुराच्या विळख्यात असलेल्या सांगली शहरातील नागरी वस्त्या बुधवारी पहाटे मुक्त झाल्या. महापालिकेने तातडीने पूर येऊन गेलेल्या नागरी वस्त्या व नदीकाठावर स्वच्छता, औषध फवारणी सुरू केली आहे.
पुरामुळे सांगलीतील २ हजार नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. पूरग्रस्त भागात अद्याप अस्वच्छता व दुर्गंधी असल्याने बहुतांश स्थलांतरित नागरिक परतले नाहीत. निवारा केंद्रात त्यांनी मुक्काम केला आहे. सांगली शहरातील पूर ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नदीच्या चारही घाटांची स्वच्छता पूर्ण केली. बारा दिवस पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि नदीच्या प्रवाहातून वाहून आलेला कचरा संकलित झाला होता. ७० टन कचरा महापालिकेने गोळा केला.
महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ.रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर आणि २०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली.
हे भाग झाले पुरातून मुक्त
सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्ता, जामवाडी, काकानगर, दत्तनगर येथील सर्व नागरी वस्त्या पुराच्या पाण्यातून मुक्त झाल्या आहेत. या ठिकाणी स्वच्छता व औषध फवारणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
पहाटे ओसरला पूर
सांगलीत बुधवारी पहाटे सहा वाजता पुराची पातळी २९ फूट ११ इंच झाल्यानंतर नदीच्या घाटासह सर्व नागरी वस्त्या मुक्त झाल्या. दिवसभरात पाणी पूर्णपणे नदीपात्रात गेले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत नदीपातळी २३ फुटांपर्यंत खाली गेली. मिरजेतील पाणीपातळी ४० फुटांवर आली आहे.