सांगली : कडेगाव-पलूसमध्ये मैत्रीचे वारे : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर संघर्षाला पूर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:21 AM2018-09-28T00:21:46+5:302018-09-28T00:25:56+5:30
कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून कदम विरुध्द देशमुख असा कडवा संघर्ष अखंड महाराष्टने अनुभवला.
अतुल जाधव ।
देवराष्ट : कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून कदम विरुध्द देशमुख असा कडवा संघर्ष अखंड महाराष्टने अनुभवला. परंतु डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर देशमुख-कदम यांचा कडवा राजकीय सघर्ष संपुष्टात आला की काय? असा प्रश्न दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. डॉ. कदम यांच्या निधनानंतर अनेक बाबतीत विश्वजित व संग्राम यांनी मैत्रीपूर्ण राजकारण केले आहे. त्यामुळे कडेगाव-पलूसच्या राजकीय मैदानात आता मैत्रीपूर्ण राजकारणाचे संकेत मिळत आहेत.
१९९५ मध्ये आमदार संपतराव देशमुख यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याविरुध्द कदम यांच्या विरोधकांची मोट बांधत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली. या निवडणुकीत डॉ. कदम यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करीत देशमुख यांनी कदम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मात्र आमदार देशमुख यांचे अवघ्या दोन वर्षातच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी डॉ. पतंगराव कदम यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली.
तेव्हापासून मतदार संघात कदम-देशमुख यांच्यात सुरू झालेला राजकीय संघर्ष डॉ. कदम यांच्या निधनापर्यंत प्रकर्षाने जाणवत होता. डॉ. कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये संग्रामसिंंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन संघर्ष कमी करण्याच्यादृष्टीने पुढचे पाऊल टाकले. त्यानंतर माजी आमदार संपतराव देशमुख यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमासाठी आमदार मोहनराव कदम व आमदार विश्वजित कदम यांनी अचानक हजेरी लावत देशमुखांसह सर्वांनाच धक्का दिला होता.
यानंतर मतदारसंघातील काही कार्यक्रमात संग्रामसिंंह देशमुख व विश्वजित कदम यांनी गळाभेट घेत संघर्षमय राजकारणाला यु टर्न देत मैत्रीपूर्ण राजकारणाचे संकेत दिले आहेत. कदम-देशमुख यांचे गेल्या २५ वर्षांपासून मतदारसंघात कडवे राजकारण सुरू होते. दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता. एवढा कडवा राजकीय संघर्ष नेते व गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही होता. यांच्या राजकीय संघर्षात अनेक कार्यकर्त्यांवर न्यायालयीन खटले अनेक वर्षे चालू होते. या सर्वाला बगल देत कदम-देशमुख यांनी कडेगाव-पलूस मतदार संघात मैत्रीपूर्ण राजकारणाचा पाया घालण्याचा प्रारंभ केलेला दिसत आहे.
कदम-देशमुख यांची जवळीक : तिसऱ्या पर्यायाचा जोर
कडेगाव-पलूस मतदार संघात कदम-देशमुख यांच्या वाढत्या जवळीकतेने मतदारसंघात तिसरा पर्याय जोर धरू लागला आहे. यांना तिसरा पर्याय म्हणून आजपर्यंत जी. डी. (बापू) लाड यांच्या गटाकडे पाहिले जात होते. मात्र वाढती कदम-देशमुख यांची जवळीक पाहता, दोन्ही बाजूकडील अनेक सक्षम कार्यकर्ते नाराज होऊ लागले आहेत.
यामुळे भाजपचे कट्टर समर्थक अॅड. प्रमोद पाटील यांनी तिसऱ्या पर्यायाची मोट बांधणी चालू केली आहे.
या मतदारसंघात लाड कुटुंबीय तिसरा पर्याय म्हणून राजकारणात नेहमीच सक्रिय आहेत. पण या कुटुंबाला आजपर्यंत राजकीय संधी मिळालेली नाही. त्यामुळे लाड व कदम-देशमुख यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्ते एकत्र येऊन कदम-देशमुख यांच्यासमोर आव्हान निर्माण करणार? असे चित्र दिसत आहे.