सांगली : एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ ला कोल्हापुरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:14 PM2018-02-16T12:14:51+5:302018-02-16T12:19:27+5:30
एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारीरोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले.
सांगली : एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले. आठ दिवसात दराचा प्रश्न न सुटल्यास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडविण्याचा इशारा देण्यात आला.
येथील शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्यातील मोचार्बाबत संघटनेची बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे उपस्थित होते. सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात कर्नाटकात गाळपासाठी गेला.
ऊस कमी होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने एफआरपी अधिक १०० रुपये आणि दोन महिन्यांनतर १०० रुपये देण्यावर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात एकमत झाले. परंतु काही कारखान्यांनी एफआरपी अधिक २०० एकदम देण्याचे जाहीर करुन टाकले. जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊसाची बिलेही जमा करायला सुरुवात करण्यात आली होती.
हंगामापासूनच साखरेच्या दरात घट झाली. साखरेचा भाव प्रतिक्विंटलवर २८०० रुपयांवर येऊन पोहोचला. एफआरपी देता देता कारखान्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले. एफआरपीप्रमाणे पहिली उचल उपलब्ध होत नसल्याने कोल्हापूरच्या धर्तीवर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला.
त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. त्याविरोधात कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. साखरेचे दर पडले असले तरी उपपदाथार्पासूनही कारखानदारांना उत्पन्न मिळते. त्यातील पैसे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत.
साखरेच्या दरात तेजी होती, तेव्हा तर जादा दर दिला होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मागील आठवड्यात साखरेचा दरात अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे कारखानदारांनी हंगाम सुरू होताना जो दर जाहीर केला आहे तो ऊस उत्पादकांना मिळाला पाहिजे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना पैसे न देण्याबाबत आघाडी केली आहे.
कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरात एक रुपयाही कमी घेणार नाही. सरकार आणि साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी कोल्हापुरात मोर्चा काढला जाणार आहे. आठ दिवसात दराचा प्रश्न मिटल्यास हंगामापूर्वी प्रश्न सोडविणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडवण्यात येईल, असा इशारा प्रवक्ते खराडे यांनी दिला.