सांगली टोळीयुद्धातील खुनाचा सचिन सावंत ‘मास्टरमार्इंड’--पंधरा जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 10:00 PM2017-09-23T22:00:11+5:302017-09-23T22:00:16+5:30
सांगली : पोलिसांच्या रेकॉर्डवरील एकेकाळचा सराईत गुंड व माजी नगरसेवक सचिन सावंत हाच सांगलीत शुक्रवारी टोळीयुद्धातून झालेल्या शकील मकानदार याच्या खुनाचा ‘मास्टरमार्इंड’ असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोलिसांच्या रेकॉर्डवरील एकेकाळचा सराईत गुंड व माजी नगरसेवक सचिन सावंत हाच सांगलीत शुक्रवारी टोळीयुद्धातून झालेल्या शकील मकानदार याच्या खुनाचा ‘मास्टरमार्इंड’ असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. सावंतसह त्याच्या टोळीतील पंधराजणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना अटक केली आहे. शकीलसह गुंड बाळू भोकरेचीही ‘गेम’ करण्याचा सावंत टोळीने कट रचला होता. पण बाळू पळून गेल्याने तो बचावल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक केलेल्यांमध्ये शाम बापू हात्तेकर (वय २६, रा. आनंदनगर, भारत सूतगिरणीजवळ, कुपवाड रस्ता, सांगली), सौरभ संजीवकुमार शितोळे (२०), करण बाळू शिंदे (१९, दोघे रा. सावंत प्लॉट, पारिजात कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) व एक अल्पवयीन यांचा समावेश आहे. चौघेही जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली. तिघांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन संशयित १७ वर्षाचा आहे. त्याची बालसुधारगृहात रवानगी झाली आहे. सचिन रमाकांत सावंत, सिद्धू कांबळे, सचिव सावंतच्या वाहनावरील चालक (नाव निष्पन्न नाही), इम्रान आवटी, नागेश ऐदाळे, शाहदाब जमादार व अनोळखी पाच ते सहा यांच्याविरुद्धही गुन्हा नोंद आहे. सचिन सावंत व त्यांच्या साथीदारांच्या शोधासाठी विश्रामबाग पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथकाची पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत.
बाळू भोकरे एकेकाळचा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. शकील मकानदारच्या खुनाचा तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने पोलिसांनी त्याची फिर्याद घेऊन सचिन सावंतसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भोकरे गेल्या कित्येक वर्षापासून सावंत टोळीचा सदस्य आहे. मकानदारही सावंतकडे होता. काही महिन्यांपूर्वी सचिन सावंत व भोकरेमध्ये आर्थिक कारणावरुन वाद झाला. यातून भोकरेने सावंत टोळीशी फारकत घेऊन स्वतंत्र टोळी निर्माण केली. दोन महिन्यापूर्वी मकानदारचाही सचिनशी आर्थिक कारणातून वाद झाला. तोही टोळीतील बाहेर पडून भोकरेशी मिळला. भोकरेसाठी तो काम करु लागला. भोकरे विश्वासू साथीदार म्हणनू त्याची ओळख झाली. आगामी महापालिका निवडणुकीत सचिन सावंतला पराभूत करू, असे दोघेही म्हणत होते. ही बाबही सचिनच्या कानावर गेली होती. त्यामुळे सचिन सावंत व त्याचे साथीदार भोकरे व मकानदारवर चिडून होते.
पूर्वनियोजित हल्ला
बाळू भोकरे गणेशनगरमध्ये राहतो. त्याची पिठाची गिरणी आहे. या गिरणीत निहाल सय्यद काम करतो. त्याला घरी सोडण्यासाठी मकानदार जात असे. त्यांना जाण्यासाठी सावंत प्लॉटमधील रस्ता आहे. त्यावेळी सावंत टोळीचे सदस्य त्यांच्याकडे रागाने पहात, शिवीगाळ करत. शुक्रवारी सकाळीही त्यांच्यात वाद झाल्याने भोकरे, मकानदार व आणखी दोघे असे विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले होते. ही बाब सावंत टोळीला समजली. त्यामुळे त्यांनी भोकरे व मकानदारच्या ‘गेम’चा कट रचला. भोकरे, मकानदारसह चौघे मराठा संघाच्या कार्यालयापासून जाताना सावंत टोळीने त्यांना घेरुन लोखंडी रॉड, काठीने हल्ला चढविला. भोकरेसह तिघे पळाले. मकानदार तावडीत सापडल्याने त्याची ‘गेम’ केली.
सचिन सावंत पुन्हा चर्चेत
सचिन सावंत हा माजी नगरसेवक आणि एकेकाळचा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध यापूर्वी नोंद होते. या गुन्'ातून त्याची निर्दोष मुक्तता झाली. महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गतही त्याच्यावर कारवाई झाली होती. डिसेंबर २००८ मध्ये गुंड अकबर अत्तारचा खून झाला. या खूनप्रकरणी सचिन सावंत व बाळू भोकरेला एकाचदिवशी अटक झाली होती. त्यानंतर सचिनविरुद्ध पुन्हा पोलिस दप्तरी कोणतेही रेकॉर्ड नाही. नऊ वर्षानंतर तो खूनप्रकरणी रेकॉर्डवर आल्याने पुन्हा चर्चेत आला आहे.
सबळ पुरावे : दत्तात्रय शिंदे
या खूनप्रकरणी चौघांना अटक केली आहे. याचा सखोल तपास केला जाईल. संशयितांविरुद्ध सबळ पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार गोळा करण्याचे काम सुरू आहे. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे स्वत: तपासावर लक्ष ठेवून आहेत. ज्यांची नावे निष्पन्न होतील, त्यांना अटक केली जाईल. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. कायद्याचा वचक बसविला जाईल.