सांगलीत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:01+5:302021-01-10T04:19:01+5:30
सांगली : दोन हजार रुपये व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ...
सांगली : दोन हजार रुपये व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून बनावट नाेटा छापण्यासाठी वापरात आणलेल्या मशीन व ९० हजार ४०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.
एलसीबीने केलेल्या कारवाईत विजय बाळासाहेब कोळी (वय ३३, रा. रेठरेधरण, ता. वाळवा सध्या, दत्तनगर,कुपवाड), शरद बापू हेगडे (३४, रा. राम रहीम कॉलनी, संजयनगर, सांगली) आणि तेजस ऊर्फ भावड्या सूर्यकांत गोरे (२३, रा. मोरोची, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
एलसीबी पथकास माहिती मिळाली की, संशयित कोळी व त्याचा मित्र हा कुपवाडमध्ये बनावट नोटा खपविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यानुसार पथकाने छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. यात कोळी याच्याकडे १०, तर हेगडे याच्याकडे दोन हजार रुपयांच्या २९ बनावट नोटा मिळाल्या. याबाबत चौकशीकरिता त्यांनी बनावट नोटांची माहिती दिली.
हेगडे याचा नातेवाईक असलेला मोरोची येथील तेजस गोरे हा त्याच्या घरामध्येच नोटा छापत असल्याचे सांगितले. तेजस हा मूळ नोटांचा फोटो मोबाईलमध्ये घेऊन तो संगणकावर फोटोशॉपमध्ये बदल करून बनावट नोटांची छापाई करीत होता. तीन महिन्यांपूर्वी हेगडे यास या नोटा खपविण्यासाठी दिल्या होत्या. त्यानुसार त्याच्याकडून प्रिंटर, स्कॅनर व बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती गेडाम यांनी दिली. एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चौकट
बनावट नोटांनी बनावट सोन्याची खरेदी
संशयितांनी बनावट नोटा पंढरपूरच्या वारीत वापरल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांनी या नोटांनी सोन्याची खरेदी केली. विशेष म्हणजे त्यांना ज्या व्यक्तीने सोने विकले ते सोनेही बनावट होते.
चौकट
दोन जिल्ह्यांत नोटा चलनात
सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आणण्यात आल्याची शक्यता असून, याबाबत संशयितांकडून अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.