विद्यार्थी नसलेल्या चार वसतिगृहांचे अनुदान रोखले, सांगली जिल्हा परिषदेने केली कारवाई
By अशोक डोंबाळे | Published: October 19, 2022 06:21 PM2022-10-19T18:21:12+5:302022-10-19T18:38:24+5:30
वसतिगृह चालकांना मान्यता का रद्द करू नये, अशी नोटीसही प्रशासनाने दिली आहे.
सांगली : जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वसतिगृहांची अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी माहुली (ता. खानापूर) आणि सांगलीतील तीन अशा चार वसतिगृहामध्ये एकही विद्यार्थी दिसून आला नाही. म्हणूनच चारही वसतिगृहांमधील कर्मचाऱ्यांचे पगार आणि अनुदानही रोखले आहे. या वसतिगृह चालकांना मान्यता का रद्द करू नये, अशी नोटीसही प्रशासनाने दिली आहे.
समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी जिल्हा परिषद अनुदान देत असलेल्या ५५ वसतिगृहांची अचानक तपासणी केली होती. या तपासणीमध्ये माहुली (ता. खानापूर) येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी वसतिगृह आणि सांगलीतील मा. ह. वि. गो. सर्वोदय छात्रालय, यशवंत विद्यार्थी वसतिगृह, बी. आर. आंबेडकर वसतिगृहांमध्ये एकही विद्यार्थी दिसून आला नाही. याबद्दल संबंधित संस्थेकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली होती. म्हणूनच जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने तपासणीत विद्यार्थी नसलेल्या वसतिगृहांचे ऑगस्ट, महिन्याचे अनुदान आणि कर्मचाऱ्यांचे पगार रोखले आहेत. संबंधित वसतिगृह चालकांना नोटीस बजावून त्यांचा खुलासा घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी दिली.
या वसतिगृहांचे अनुदान रोखले
- सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी वसतिगृह माहुली (ता. खानापूर)
- मा. ह. वि. गो. सर्वोदय छात्रालय, सांगली
- यशवंत विद्यार्थी वसतिगृह, सांगली
- बी. आर. आंबेडकर वसतिगृह, सांगली.
५५ वसतिगृहांना साडेअठावीस लाखांचा निधी वर्ग
जिल्ह्यातील ५५ वसतिगृहांमधील अधीक्षक, चौकीदार आणि स्वयंपाकी, आदी १६३ कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांच्या पगारासाठी २८ लाख ४७ हजार ५७५ रुपये जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने संबंधित वसतिगृहांना वर्ग केले आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील अनेक वसतिगृहांमधील कामकाज चांगले आहे. पण, चार वसतिगृहांमध्ये एकही विद्यार्थी चौकशीत दिसून आला नाही. म्हणून संबंधित चार वसतिगृहांमधील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन रोखले आहे. तसेच संबंधित वसतिगृह चालकांना आपल्याकडे विद्यार्थी नसल्यामुळे आपली मान्यता का रद्द करू नये, अशी नोटीसही बजावली आहे. - बाळासाहेब कामत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.