सांगलीची हवा चांगली; आयुष्यमानही चांगले, राज्याच्या तुलनेत प्रदूषण कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 01:11 PM2024-11-27T13:11:17+5:302024-11-27T13:11:52+5:30
मुंबई, पुण्यालाही टाकले मागे : हवेत धूलिकणांचे प्रमाण समाधानकारक
सांगली : सांगली सर्वांत आरोग्यदायी शहर ठरले आहे. जिल्ह्यातील प्रदूषण राज्याच्या तुलनेत अगदी कमी असून, सर्वाधिक आरोग्यदायी हवा सांगलीची असल्याचे निरीक्षण प्रदूषण मंडळाने नोंदविले आहे. चांगल्या हवेने सांगलीकरांचे आयुष्यमानही चांगले ठरले आहे.
सांगलीकरांच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद ठरली आहे. हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मापदंडानुसार ० ते ५० (२.५ पीएम) या स्तरातील हवा सर्वांत चांगली समजली जाते. येथील पर्यावरणात भरपूर ऑक्सिजन देणारी झाडे मोठ्या संख्येने असतात, तसेच औद्योगिक संस्थाही हवेत कार्बनडाय ऑक्साइड, कार्बन मोनो ऑक्साइडसारख्या वायूंचे हवेत उत्सर्जन टाळण्यासाठी प्रयत्न करतात. हवेत धूलिकणांचे प्रमाण नियंत्रित असते. त्यामुळे प्रदूषणाची पातळी आटोक्यात असते. सांगली, कोल्हापुरातील हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निरीक्षण आहे. या जिल्ह्यांचा समावेश आरोग्यदायी शहरांमध्ये होतो.
५१ ते १० या इंडेक्समधील हवा समाधानकारक समजली जाते. राज्यातील ११ शहरे या इंडेक्समध्ये बसतात. त्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, पिंपरी, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जालना, सोलापूर यांचा समावेश आहे. तेथील नागरिकांना आरोग्याचा धोका नसून शुद्ध हवेत श्वास घेता येतो. दमा, ब्राँकॉयटिससारखे श्वसनाचे रोग होण्याची शक्यता फारच कमी असते.
रेस्पायर लिव्हिंग सायन्सेसच्या ॲटलास एक्यू प्लॅटफाॅर्मवरील एका अभ्यासात सांगलीच्या आरोग्यदायी हवेचा अभ्यास नोंदविण्यात आला आहे. त्यासाठी ३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीतील हवेचा अभ्यास करण्यात आला. ३१ शहरांच्या तुलनेत सांगलीची हवा शुद्ध आणि आरोग्यदायी असल्याचे आढळले. हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मोजण्यात आले असता ते पीएम २.५ म्हणजे समाधानकारक आढळले. सांगली शहर हवेच्या गुणवत्तेत चांगल्या श्रेणीत, तर अन्य शहरे समाधानकारक श्रेणीत आढळली. कल्याण, चंद्रपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरेदेखील स्वच्छ हवेची आहेत.