सांगलीत मधुमेहापेक्षा रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 01:48 PM2020-09-29T13:48:54+5:302020-09-29T14:05:31+5:30
राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात २४५ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, यात मधुमेहापेक्षा रक्तदाबाचेच अधिक रुग्ण आढळून आले आहेत; तर कोरोनाच्या २७४ संशयित रुग्णांची तातडीने चाचणीसाठी शिफारस करण्यात आली. त्यात ४२ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
शीतल पाटील
सांगली : राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात २४५ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, यात मधुमेहापेक्षा रक्तदाबाचेच अधिक रुग्ण आढळून आले आहेत; तर कोरोनाच्या २७४ संशयित रुग्णांची तातडीने चाचणीसाठी शिफारस करण्यात आली. त्यात ४२ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, शासनाने प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान हाती घेतले आहे.
महापालिका क्षेत्रात या अभियानाला सुरुवात झाली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनाखाली २४५ पथके कार्यरत आहेत. यात आशा वर्कर्स, शिक्षकांसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त शहा यांच्याकडे या अभियानाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांची जवळपास साडेपाच लाख लोकसंख्या आहे, तर एकूण १ लाख २२ हजार कुटुंबे आहेत. गेल्या आठ दिवसांत ३० हजार कुटुंबांतील एक लाख ३० हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यात मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांची माहिती घेण्यात आली. या सर्वेक्षणात रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण मधुमेहापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. तपासणीत ताप, खोकला या कोरोनासदृश २७४ रुग्ण आढळून आले.
या रुग्णांना तातडीने कोरोना चाचणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ४२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अभियानाची पहिली फेरी १० आॅक्टोबरला संपणार आहे. तत्पूर्वीच महापालिका क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण होईल, असे डॉ. शहा यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्राचा आढावा
- एकूण कुटुंबे : १ लाख २२ हजार
- एकूण लोकसंख्या : ५ लाख ५० हजार
- आजअखेर सर्वेक्षण (घरे) : ३०, २३१
- आजअखेर तपासणी : १,३०,४९८
- मधुमेह रुग्ण : २६३३
- रक्तदाबाचे रुग्ण : ४२८३
- इतर आजार : २९३
- कोरोना संशयित : २७४
- पॉझिटिव्ह : ४२