सांगलीत ‘वसंतदादा’समोर गुरुवारपासून ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:24 AM2017-11-05T00:24:17+5:302017-11-05T00:30:17+5:30
सांगली : दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने वसंतदादा साखर कारखान्यातील दि. १ जुलैपूर्वीची कुठलीही देणी आम्ही देणे लागत नाही,
सांगली : दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने वसंतदादा साखर कारखान्यातील दि. १ जुलैपूर्वीची कुठलीही देणी आम्ही देणे लागत नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सेवानिवृत्त कामगार शनिवारी संतप्त झाले. देणे लागत नाही, तर वसंतदादा कारखान्याचा बॉयलर आणि यंत्रसामग्री का वापरता, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर कामगारांनी दि. ९ नोव्हेंबरपासून दत्त इंडिया कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला.
वसंतदादा कारखान्यातील सुमारे सातशे सेवानिवृत्त कामगारांचा थकीत फंड आणि ग्रॅच्युईटीच्या प्रश्नावर येथील कामगार भवनमध्ये शनिवारी बैठक झाली. बैठकीस अॅड. के. डी. शिंदे, श्रीकांत देसाई, घनशाम पाटील, विष्णू माळी, विलास पाटील, प्रदीप शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नांवर प्राथमिक चर्चा झाल्यानंतर सर्व कामगार वसंतदादा कारखाना चालवण्यास घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीच्या मुख्य गेटजवळ गेले. तेथे कामगारांनी ‘देणी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘सेवानिवृत्त कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी दत्त इंडिया कंपनीच्या प्रशासनाने सांगितले की, आम्ही जिल्हा बँकेशी करार केला असून, त्यामध्ये दि. १ जुलै २०१७ पूर्वीची कोणतीही देणी देणे लागत नाही.
व्यवस्थापनाने कामगारांसमोर करारपत्रच ठेवले. व्यवस्थापनाच्या भूमिकेमुळे सेवानिवृत्त कामगार आणखी संतप्त झाले. दि. १ जुलैपूर्वीची तुम्ही काही देणी देणार नसाल तर, कारखान्याचा बॉयलर आणि यंत्रसामग्री तुम्ही कशासाठी वापरता? कारखान्याकडून आम्हाला आमच्या हक्काची देणी मिळाली पाहिजेत, यासाठी आमचा लढा चालू आहे. व्यवस्थापनाने चुकीची भूमिका घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अॅड के. डी. शिंदे यांनी दिला.
कामगारांचा आक्रमक पवित्रा पाहून दत्त इंडियाच्या व्यवस्थापनाने लवचिक भूमिका घेतली. कारखान्यामध्ये पुन्हा बैठक झाली. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, सेवानिवृत्त कामगारांचे प्रतिनिधी अॅड. शिंदे, प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते. व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांची वेळ घेऊन बैठक घेण्यात येईल. बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार कामगारांची देणी दिली जातील, असे आश्वासन दिले.
दत्त इंडिया कंपनीने थकीत देण्याचा चेंडू जिल्हा बँकेच्या कोर्टात टोलविल्यामुळे सेवानिवृत्त कामगार आक्रमक झाले आहेत. दत्त इंडिया आणि जिल्हा बँक काय निर्णय घ्यायचे ते घेऊ देत, आम्ही दि. ९ नोव्हेंबरपासून दत्त इंडियाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारणार आहोत. देणी दिल्याशिवाय हलणार नाही. हे आंदोलन वाढवण्याचा प्रयत्न केल्यास सेवेतील कामगारही संपात उतरतील, असा इशारा अॅड. के. डी. शिंदे आणि कामगार युनियनच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.
थकीत देणी एकरकमीच पाहिजेत
सेवानिवृत्त कामगारांची देणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे एकाचवेळी ही देणी न देता अन्य देणेकºयांप्रमाणे टप्प्या-टप्प्याने ती देण्याबाबतची चर्चा झाली. दहा टप्पे पाडून देण्यावर दत्त इंडिया कंपनीचे प्रशासन तयार आहे. पण, सेवानिवृत्त कामगारांनी त्यास तीव्र विरोध करून थकीत देणी एकरकमीच मिळाली पाहिजेत, अशी ठोस भूमिका घेतली आहे, अशी माहिती अॅड. शिंदे यांनी दिली.