नाशिक संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान सांगलीला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:24+5:302021-01-16T04:31:24+5:30
सांगली : नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी पुन्हा एकदा सांगलीला मिळण्याची शक्यता झाली आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर ...
सांगली : नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी पुन्हा एकदा सांगलीला मिळण्याची शक्यता झाली आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांचे नाव त्यासाठी पुढे आले आहे.
आगामी संमेलन नाशिकमध्ये होत आहे; शिवाय भवाळकर यादेखील मूळ नाशिकच्याच असल्याने भवाळकर यांचे नाव निश्चित होण्यात अडचणी नसाव्यात, अशी साहित्यवर्तुळात चर्चा आहे. अध्यक्षपदाचे दावेदार अद्याप निश्चित झाले नसले तरी सांगलीतून भवाळकर आणि नाशिकमधून ज्येष्ठ लेखक मनोहर शहाणे यांची नावे पुढे आली आहेत.
संमेलनाचे अध्यक्षपद बिनविरोध निवडले जावे असा आग्रह साहित्यिक मंडळी सातत्याने धरत आहेत. त्यामुळे एकापेक्षा अधिक इच्छुक पुढे आले तर साहित्यिक कोंडी होणार हे निश्चित आहे. भवाळकर यांनी साहित्याची चौफेर मुशाफिरी केली आहे. विशेषत: लोकसाहित्यामध्ये त्यांचा शब्द अखेरचा मानला जातो. समीक्षा आणि वैचारिक लेखनामध्येही त्यांनी खोल ठसा उमटविला आहे. नाट्यचळवळीशी त्यांचा निकटचा संबंध राहिला आहे. राज्यभरातील साहित्याच्या वर्तुळात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. स्त्रीवादी भूमिका घेणाऱ्या भवाळकर पुरोगामी चळवळीशीही निगडित आहेत. फक्त साहित्यिक म्हणून विशिष्ट वर्तुळात स्वत:ला बद्ध न करता विविध सामाजिक आघाड्यांवरही त्या अग्रेसर राहिल्या आहेत. प्रसिद्धिपराङमुख असल्या तरी स्वयंप्रकाशित असल्याने साहित्यवर्तुळात वजन राखून आहेत. या स्थितीत त्यांची निवड ही सांगलीकरांसाठीही गौरवाची असेल.
गेल्या काही वर्षांत संमेलनाध्यक्ष निवडीला राजकीय किनार मिळत असल्याने अनेक ख्यातकीर्त साहित्यिकांनी संमेलनाध्यक्षपदापासून चार हात लांबच राहणे पसंत केले आहे. श्रीमती भवाळकर यांच्याबाबतीतही तीच स्थिती आहे. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदाची निवड एकमताने आणि राजकारणविरहित व्हावी, अशी सांगलीकर साहित्यिकांची सार्थ अपेक्षा आहे.
चौकट
नाशिकमधील बैठकीत निर्णय
दि. २३ व २४ जानेवारीला साहित्य महामंडळाची बैठक नाशिकमध्ये होत आहे. त्यावेळी संमेलनाध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. तोपर्यंत आणखी काही नावे पुढे येतील काय याविषयी उत्सुकता आहे.
-------