सांगली : भिडेंच्या आंब्यांनी सोशल मिडियावर हास्यकल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:13 PM2018-06-13T15:13:31+5:302018-06-13T15:13:31+5:30
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंब्यांवरून केलेल्या विधानाने एकीकडे राजकीय पटलावर टीकाटिपणी सुरू असतानाच सोशल मिडियावर हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. किस्से, विनोद, कविता आणि चारोळ््यांच्या माध्यमातून भिडे गुरुजींचे आंबे नेटकऱ्यांमुळे तेजीत आहेत.
सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंब्यांवरून केलेल्या विधानाने एकीकडे राजकीय पटलावर टीकाटिपणी सुरू असतानाच सोशल मिडियावर हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. किस्से, विनोद, कविता आणि चारोळ््यांच्या माध्यमातून भिडे गुरुजींचे आंबे नेटकऱ्यांमुळे तेजीत आहेत.
येथे भिडे गुरुजींच्या बागेतील आंबे मिळतील, आम्रसेवेने होती पुत्र-पुत्री, तर मग का करणे लागे पती?, प्रेयसीची प्रियकराला धमकी, लग्न करतोस की भिडेंच्या शेतातले आंबे खाऊ, तत्पर साऱ्या जनात, आमसूत्राचा बोलबोला,भिडे के आम इतने खास क्युं है?, आम खाओ, खुद जान जाओ, एकीकडे रामदेव बाबा, दुसरीकडे आमदेव बाबा अशा अनेक विनोदांची चलती सोशल मिडियावर आहे.
देश विदेशातील शास्त्रज्ञ भिडे गुरुजींच्या आंब्यावरील संशोधनासाठी भारतात दाखल, शासनाची आंबे योजना अशाप्रकारच्या सचित्र विनोदनिर्मितीनेही सोशल मिडिया व्यापला आहे.
गेल्या चार दिवसांपासून हा हास्यकल्लोळ सुरू आहे. आंब्यांचा मोसम संपला तरी भिडे गुरुजींच्या आंब्याची बाग नेटवर फुलली आहे. मनोरंजनाची, हास्याची चव चाखत या बागेवर नेटकऱ्यांनी यथेच्छ ताव मारण्यास सुरुवात केली आहे.
आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते या भिडे गुरुजींच्या वक्तव्यावरून राजकीय लोकांकडून टीकाटिपणी सुरू आहे. राजकीय पटलावरही हा विषय चर्चेचा बनला आहे. तरीही सोशल मिडियावर राजकीय मते, टिकाटिपणीपेक्षा विनोद, किस्से आणि चारोळ््यांनाच अधिक पसंती मिळताना दिसत आहे.
पती-पत्नी, विद्यार्थी-शिक्षक या विभागातील विनोदांची गेल्या काही दिवसांपासून चलती होती. आता हे सर्व विनोद कालबाह्य होऊन त्याची जागा भिडे गुरुजींच्या आंब्यांनी घेतली आहे.