सांगली : ऐतिहासिक कागद मिळतात तरी कसे?, उलगडली ऐतिहासिक कागदांच्या संग्रहाची सुंदर कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:24 PM2018-02-07T14:24:32+5:302018-02-07T14:38:28+5:30
ऐतिहासिक कागदपत्रे मिळतात तरी कसे आणि कुठे, असा प्रश्न मिरजेचे इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांना एका कार्यक्रमात तरुणांनी विचारला आणि उत्तरातून उलगडली ऐतिहासिक कागदांच्या संग्रहाची सुंदर कहाणी...
अविनाश कोळी
सांगली : ऐतिहासिक कागदपत्रे मिळतात तरी कसे आणि कुठे, असा प्रश्न मिरजेचे इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांना एका कार्यक्रमात तरुणांनी विचारला आणि उत्तरातून उलगडली ऐतिहासिक कागदपत्रांच्या संग्रहाची सुंदर कहाणी...
कुमठेकरांनी आमच्या प्रतिनिधींशी याच विषयावर बोलताना सांगितले की, ऐतिहासिक कागद सहजासहजी नाही मिळत...अनेकदा हेलपाटे घालावे लागतात. कचराकुंड्यासारखी अवस्था झालेल्या दफ्तरखान्यात ऐतिहासिक कागदपत्रांचा उलथापालथ करावी लागते..तेव्हा काही मौल्यवान रत्ने गवसतात..
कुठे वाड्यांच्या माळ्यावर, फडताळात, कापडांच्या बासनात कैक वर्षे वाळवी- झुरळांची भक्ष्य बनलेली कागदपत्रे प्रकाशाची वाट पाहत असतात..त्या त्या मालकांशी कधी गोड बोलून, पोटात शिरून ती मिळवावी लागतात..
काही कागदपत्रे रद्दीत आलेली असतात, त्यामुळे रद्दीवाल्यांशी मैत्र जोडावे लागते..मग ते त्यांच्या लेखी रद्दी असलेल्या ऐतिहासिक कागदांचं दान किलोच्या किंमतीत आपल्या पदरी घालतात..काही चाणाक्ष रद्दीवाल्यांच्या लक्षात या कागदांचं महत्त्व आलं की मग मात्र खिसा जास्त रिकामा करावा लागतो..
हे ऐतिहासिक कागद कुठे कुठे सापडतात? याचं उत्तर आहे, कुठेही आणि कशाही अवस्थेत ..! ( सोबत दिलेली छायाचित्रे यावर भाष्य करण्यास पुरेशी आहेत) जुन्या देवदेवतांच्या चित्रांच्या फोटो फ्रेमला मागील आतील बाजूस जुने वर्तमानपत्राचे अंक आधारासाठी असतात..काही जुने कागद, जुनी हँडबिलं, जाहिराती, निवेदनं, असे नानाप्रकारचे कागद या फ्रेमसाठी वापरलेले असतात..
अशा फ्रेम जुन्या झाल्या की टाकून देतात किंवा देवतांच्या असल्यामुळे विसर्जित करतात..मग..अशा फ्रेम दुरूस्त करणाऱ्यांना सांगून त्यात असणारे जुने वर्तमानपत्राचे अंक, हॅडबिलं असे काहीबाही कागद मिळतात..मला १९०० ते १९५० दरम्यानचे काही दैनिकांचे अंक आणि पिठाच्या गिरणीची जाहिरात, काही तत्कालीन नाटकांच्या जाहिराती अशा फ्रेमच्या मागेच मिळाल्या आहेत..
त्यापैकी काही देवतांच्या फ्रेम कृष्णा घाटावर विसर्जित करण्यासाठी आल्या होत्या..त्यामुळे कृष्णा नदीवर नित्य पोहण्यात आणि मासे पकडण्यास जाणाऱ्या व्यक्तींशी नेहमी संपर्क असतो..त्यांनी अशा काही फ्रेममधून दुर्मिळ कागद मिळवुन दिले आहेत..नदीवर विसर्जित करण्यासाठी आलेल्या काही दुर्मिळ ऐतिहासिक पोथ्याही याच कृष्णातीरी मला मिळाल्या आहेत..
अनेक जुन्या वाड्यांमध्ये तारकेट म्हणजे ज्या तारेत घरी आलेली पत्रे, बिले, पावत्या, निमंत्रणपत्रिका खोचून ठेवलेल्या असतात. जोपर्यत असे तारकेट गळ्यापर्यंत भरत नाही तोपर्यंत त्यामध्ये अनेक वर्षांचे कागद खोचून ठेवले जातात..
अशा तारकेटमधून अनेक महनीय व्यक्तिंच्या लग्नांच्या, मुंजींच्या निमंत्रणपत्रिका, विविध संस्थांच्या पायाभरणा, उद्घाटन, रौप्य, सुवर्ण, शताब्दी महोत्सवांच्या पत्रिका मिळाल्या आहेत..ख्यातनाम अभिनेत्री नूतन च्या लग्नाची पत्रिका अशाच एका तारकेटमध्ये मला मिळाली..