प्रदूषित शहरांच्या यादीत सांगली, धुळ नियंत्रणासाठी महापालिका स्वयंचलित यंत्र खरेदी करणार
By शीतल पाटील | Published: May 9, 2023 07:09 PM2023-05-09T19:09:48+5:302023-05-09T19:10:35+5:30
उपाययोजनांसाठी केंद्र शासनाने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम आखला आहे. त्यानुसार महापालिकेला आठ कोटींचा निधी मिळाला
सांगली: महापालिका क्षेत्रात धुळीचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासनाने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांर्तगत धूळ नियंत्रणासाठी स्वयंचलित फॉग माउंटेड कॅनन सिस्टिमचे दोन ट्रक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी९९ लाख ९० हजार खर्च अपेक्षित असून शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे.
केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी देशातील प्रदूषित शहरांची यादी मार्चमध्ये जाहीर केली होती. त्यामध्ये राज्यातील १९ शहरात सांगलीचा समावेश झाला आहे. सांगलीत धुळीमुळे हवा प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाचे निर्देश आहेत. उपाययोजनांसाठी केंद्र शासनाने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम आखला आहे. त्यानुसार महापालिकेला आठ कोटींचा निधी मिळाला आहे.
महापालिकेने या निधीतून हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी दोन स्वयंचलित ट्रक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाच्या जीईएम पोर्टलवर निविदा प्रसिध्द मागविण्यासह ९९ लाख ९० हजार रूपयांच्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या सभेत आला आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर दोन ट्रकच्या सहाय्याने शहरातील हवा प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.