सांगली : पोलिसांच्या संरक्षणात फिराव लागेल तेंव्हा निवडणूक लढवणार नाही : राजू शेट्टी, इस्लामपूर येथील कार्यालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:12 PM2018-02-26T19:12:09+5:302018-02-26T19:12:09+5:30
इस्लामपूर : माझ्या स्वत:च्या मतदार संघात पोलिसांचे संरक्षण घेवून फिरण्याची वेळ आल्यास त्यादिवशी निवडणूक लढविण्याचे बंद करीन, असे आव्हान देत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी आज इस्लामपुरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणी करुन कार्यकर्त्यांसोबत चहा— टपरीच्या कट्ट्यावर बसून चहापानही घेतले.
इस्लामपूर : माझ्या स्वत:च्या मतदार संघात पोलिसांचे संरक्षण घेवून फिरण्याची वेळ आल्यास त्यादिवशी निवडणूक लढविण्याचे बंद करीन, असे आव्हान देत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी आज इस्लामपुरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणी करुन कार्यकर्त्यांसोबत चहा— टपरीच्या कट्ट्यावर बसून चहापानही घेतले.
द'ारी (ता. पलूस) येथे कराड—गुहागर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या व्यापक बैठकीसाठी ते ताकारीकडे निघाले होते.
यावेळी त्यांनी दोन दिवसांपूर्वी रयत क्रांती आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यालयाची पाहणी केली. पाहणीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
रयत आघाडीने शेट्टी यांना तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा दिला होता. त्याविषयी बोलताना शेट्टी म्हणाले, मी रविवारी एकटाच इस्लामपुरमध्ये काही काळ फिरलो. त्याची कुणालाही कुणकुण लागली नाही. त्यामुळे असले इशारे मी जुमानत नाही.
खासदार शेट्टी म्हणाले, माझे कार्यकर्ते भिकारीही नाहीत आणि खंडणीबहाद्दरही नाहीत. ते कष्टकरी आहेत. त्यामुळे सर्वजण मिळून वर्गणी काढून स्वाभिमानीचे कार्यालय पुन्हा सुसज्ज करतील. त्यासाठी कोणाकडे काही मागण्याची गरज नाही.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे, आप्पासाहेब पाटील, विकास देशमुख, अॅड. एस. यु. संदे, शहाजी पाटील, तानाजी साठे, भाऊ पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यांच्याकडे जावू नका..!
खासदार शेट्टी हे कार्यकर्त्यांच्या ताफ्यातून जाण्यासाठी निघाल्यावर इस्लामपूरमधील कार्यकर्त्यांनी खासदार शेट्टी यांना आमदार जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्याकडे जावू नका. लोकांमध्ये नाराजी पसरते असे सांगत आपली वाटचाल स्वतंत्रपणे करण्याची मागणी केली. त्यावर शेट्टी यांनी याविषयी तुम्ही अजिबात काळजी करु नका. फक्त त्याच रस्त्याने जाणार असल्याने त्यांच्या निमंत्रणावरुन गेलो, असे सांगत कार्यकर्त्यांची समजूत घातली.