सांगली 'आयटीआय'ला अण्णा भाऊ साठे यांचे नाव देणार, शासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 05:50 PM2024-09-25T17:50:05+5:302024-09-25T18:08:21+5:30
संस्थेच्या हीरकमहोत्सव वर्षात बहुमान
सांगली : सांगली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीत तसा निर्णय झाला. त्यामुळे ही संस्था आता अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखली जाईल.
राज्यातील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तिमत्त्वांचे नाव देण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्यात सांगलीतील संस्थेचाही समावेश आहे. ६० वर्षांपूर्वी सांगलीत सुरू झालेली ही संस्था आजतागायत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावानेच ओळखली जाते.
आजवर हजारो विद्यार्थी येथून प्रशिक्षित होऊन बाहेर पडले. त्यांनी नोकरी, व्यवसायांत बस्तान बसविले. अनेकांनी शासकीय नोकरीतून करिअर केले. अनेक जण नोकरीतून निवृत्तही झाले. पण, सर्वांसाठी ही संस्था शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा सांगली आयटीआय याच नावाने परिचित राहिली. आता शासनाच्या निर्णयानुसार तिचे नाव अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे होणार आहे.
सांगलीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे अण्णा भाऊंच्या अनुयायांच्या मागणीला यश आले आहे. लोकशाहिरांचे साहित्य आणि त्यांची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी या नामकरणाचा फायदा होईल. - कुलदीप देवकुळे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, सांगली