सांगली कारागृह कैद्यांनी खचाखच
By admin | Published: July 22, 2016 11:58 PM2016-07-22T23:58:56+5:302016-07-23T00:08:30+5:30
क्षमता ओलांडली; ४०१ कैदी; ३५० पेक्षा जादा ठेवण्यास असमर्थता; महानिरीक्षकांना प्रस्ताव
सांगली : सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांची क्षमता ओलांडली आहे. २३५ क्षमता असलेल्या कारागृहात ४०१ कैदी आहेत. यामध्ये ३८३ पुरुष व १८ महिलांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या कैद्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. साडेतीनशेपेक्षा जादा कैदी येथे ठेवणे धोकादायक बनले असून, त्यांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलविण्यात यावे, असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांना सादर केला आहे.
जिल्हा कारागृह संस्थानकालीन आहे. २०५ पुरुष व ३० महिला असे २३५ कैदी ठेवण्याची क्षमता असलेले हे कारागृह आहे. पण गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याने कैद्यांची संख्या वेगाने वाढत गेली. सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहाच्या १८२ मीटर परिसरात नवीन इमारत बांधण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण यापूर्वी टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या आहेत. कारागृहाच्या सभोवताली इमारती आहेत. पटवर्धन हायस्कूलची इमारत कारागृहाला लागून आहे. हायस्कूलच्या छतावरुन तसेच परिसरातील इमारतींवरुन कारागृहात काय सुरु आहे, हे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे कैद्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी गतवर्षी कारागृहाची पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यांना सुरक्षेत मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून आल्याने त्यांनी कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर स्थलांतर करण्याची सूचना केली होती.
तत्कालीन अधीक्षक एम. एस. पवार यांनी शासनाला कवलापूरच्या जागेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. पण शासनाकडून पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सध्याचे अधीक्षक सुशील कुंभार, तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे हे जागेसाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना अजूनही यश आलेले नाही. जागेच्याबाबतीत शासनाची उदासीन भूमिका असल्याने कारागृह प्रशासनाने साडेतीनशेपेक्षा जादा कैदी ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. शुक्रवारी तब्बल ४०१ कैदी होते. त्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. चार बरॅक आहेत. प्रत्येक बऱ्याकमध्ये ५० कैदी ठेवले जातात. आताच्या स्थितीला प्रत्येक बऱ्याकमध्ये ११० ते ११५ कैदी ठेवावे लागत आहेत.
३५० कैदी ठेवण्याची व्यवस्था आहे. पण त्यापेक्षा जादा असणारे कैदी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलवावेत, असा प्रस्ताव कारागृह महानिरीक्षकांना सादर केला आहे. (प्रतिनिधी)
गुन्हे गंभीर :
जामीन नाकारला
खुनातील १७९ कैदी आहेत. यामध्ये १७४ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. याशिवाय बलात्कार, बेकायदा हत्यार बाळगणे, दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील १५५ कैदी आहेत. साधारपणे ३३४ कैदी गंभीर गुन्ह्यातील आहेत. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला आहे. तसेच शिक्षा झालेले चार कैदी आहेत. त्यामुळे त्यांना येथे बंदिस्त ठेवावेच लागत आहेत. त्यामुळेच प्रशासनाने ३५० पेक्षा जादा कैदी ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे.
३० कैद्यांना : कळंब्याला हलविले
कारागृहात कैद्यांना ठेवायला जागा नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ३० कैद्यांना गेल्या आठवड्यात कळंबा कारागृहात हलविण्यात आले आहे. संजयनगरमधील मनोज कदम खुनातील गुंड म्हमद्या नदाफसह २६ कैद्यांना यापूर्वीच पुण्यातील येरवडा येथे, तसेच गोकुळनगरमधील रवींद्र कांबळे खुनातील दुर्गेश पवारसह १२ कैद्यांना कळंबा कारागृहात हलविले आहे. सध्या या दोन टोळ्या व हलविलेले ३० कैदी, असे ६८ कैदी येथे राहिले असते, तर कैद्यांचा आकडा ४६९ च्या घरात गेला असता.
विशेष बऱ्याक उघडल्या!
कारागृहात विशेष बऱ्याकच्या पाच कोठड्या आहेत. प्रत्येक कोठडीत तीन कैद्यांना ठेवता येऊ शकते. मोठ्या बऱ्याकमध्ये ठेवण्यास जागा नसल्याने शुक्रवारी प्रशासनाने विशेष बऱ्याक उघडून स्वच्छता सुरु ठेवली आहे. यामध्ये २५ कैद्यांना ठेवण्याची सोय करण्यात आली आहे.