सांगली : अट्टल घरफोड्यास पुनवतमध्ये अटक दागिने जप्त : सांगली, कोल्हापुरात घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:53 AM2018-09-29T11:53:23+5:302018-09-29T11:54:45+5:30
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिका रचलेल्या लोहेश ऊर्फ तोहया शिंदे-काळे (वय २७, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) यास पुनवत (ता. शिराळा) येथे पकडण्यात शुक्रवारी यश आले. त्याच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
सांगली : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिका रचलेल्या लोहेश ऊर्फ तोहया शिंदे-काळे (वय २७, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) यास पुनवत (ता. शिराळा) येथे पकडण्यात शुक्रवारी यश आले. त्याच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यात सोन्याचे दागिने, मोबाईल असा पावणेतीन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
लोहेश काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. घरफोड्या करुन लाखोंचा ऐवज लंपास करण्यात त्याचा हातखंडा आहे. तो पुनवत येथे एका वस्तीवर आश्रयाला असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या खोलीत सोन्याचे दीड तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याची अंगठी सापडली. हे दागिने त्याने भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील दिनकर आलुगडे यांच्या घरातून ते चोरल्याची कबुली दिली. आलुगडे कुटुंबीय झोेपेत असताना एकाच्या मदतीने त्याने ही चोरी केली होती.
सोनवडे (ता. हातकणंगले) येथील घरात तसेच शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी असे आणखी तीन घरफोडीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले आहेत. सोनवडेतील प्रवीण अतिग्रे यांच्या घरातून लंपास केलेले सोन्याचे २७ ग्रॅमचे गंठण, एक मोबाईल असा ७८ हजाराचा माल जप्त केला आहे. शाहुवाडी पोलिसांच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील एक लाख ३८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
साथीदार पसार
लोहेश काळे याच्या साथीदाराचे नाव निष्पन्न झाले आहेत. लोहेश पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच तो पसार झाला आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यात आश्रयाला असल्याचा संशय आहे. लवकरच त्यास पकडण्यात यश येईल, असे निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले.