सांगली ते कर्नाटक भ्रूणहत्याकांडाचे ‘रॅकेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:46 AM2018-09-17T00:46:29+5:302018-09-17T00:46:35+5:30
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांडाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सांगलीत चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आणखी एक भ्रूण हत्याकांड उघडकीस आल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. सांगली आणि कर्नाटक या दोन शहरात भ्रूणहत्याकांडाचे ‘रॅकेट’ सक्रिय आहे. यामध्ये काही ‘बड्या’ डॉक्टरांचा सहभाग आहे. ‘रॅकेट’ची पाळेमुळे खणून काढण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. म्हैसाळ प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह १३ संशयित जामिनावर बाहेर आले आहेत. यावरून कायद्याचा धाकही कमी झाला असल्याचे चित्र आहे.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा डॉ. खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपातावेळी मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयावर छापा टाकल्यानंतर भ्रूणहत्याकांडाचे रॅकेट उघडकीस आले होते. पोलीस तपासादरम्यान ओढ्यात १९ अर्भकांचे अवशेष प्लास्टिकच्या पिशव्यांत सापडले. खिद्रापुरेला अटक केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती कर्नाटकातील कागवाड, विजापूरपर्यंत वाढत गेली. याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. शिवाय केंद्रीय चौकशी समितीनेही चौकशी केली होती. अशाप्रकारची घटना राज्यात कुठेही होऊ नये, यासाठी शासनाने जिल्हास्तरावर शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली. या समितीने चौकशी केली. म्हैसाळ भ्रूणहत्याकांडातील दोष शोधून काढले. पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी उपायही सुचविले. याचा अहवाल शासनाने सादर केला. परंतु शासनाने या अहवालाचे काहीच अवलोकन केले नसल्याचे सांगलीत उघडकीस आलेल्या भ्रूण हत्याकांडामुळे स्पष्ट झाले आहे.
म्हैसाळ प्रकरणात खिद्रापुरे याचे कर्नाटकातील डॉक्टरांशी लागेबांधे होते. तेथील गरोदर महिलांची कर्नाटकातील रुग्णालयात सोनोग्राफी तपासणी केली जात असे. मुलगी असेल तिची खिद्रापुरेच्या रुग्णालयात हत्या केली जायची. चौगुले हॉस्पिटलच्या ‘रॅकेट’चे ‘कनेक्शन’ही कर्नाटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य पथकाने घाईगडबडीने छापा टाकला. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही.
रुग्णालयात कर्नाटकातील सात महिलांचे गर्भपात केल्याचे उघडकीस आणले. पण गर्भपात का केला? मुलगी होती म्हणून का? गर्भपात केल्यानंतर भ्रूणांची विल्हेवाट कुठे लावली? महिलांची सोनोग्राफी तपासणी कुठे केली? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? ही सर्व माहिती त्यांंच्या रेकॉर्डवर येणे गरजेचे होते; पण पोलिसांकडे ढकलून ते बाजूला झाले आहेत.
वंश वाढविण्यासाठी खटाटोप
वंशाला मुलगा हवाच...ही समाजाची मानसिकता अजूनही बदलली नाही. मुलग्याच्या हव्यासापोटी मुलगी असेल तर, तिची हत्या करण्याचे काम पालकांपासून सुरू होत आहे. यासाठी पालक पाहिजे तेवढी किंमत मोजत आहेत. त्यामुळे खिद्रापुरे, चौगुले यांच्यासारखा आणखी काही हॉस्पिटलमध्ये भ्रूण हत्याकांडाचा रात्रीस खेळ चालत आहे. मुलगा आणि मुलगी यामधील गैरसमज जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत अशी ‘रॅकेट’ सक्रिय राहू शकतात.
हॉस्पिटल ‘फेमस’
सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काही हॉस्पिटल गर्भपातासाठी ‘फेमस’ आहेत. रात्रीच्यावेळी भ्रूणहत्याकांडाचा घाव घातला जातो. यासाठी सांगली आणि कर्नाटकातील डॉक्टरांची साखळीच आहे. अनेक डॉक्टर पदवी नसतानाही गर्भपात करतात, हे खिद्रापुरेच्या कारनाम्यावरून यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. हे ‘रॅकेट’ चालविण्यासाठी एजंटांची नियुक्ती केली आहे. एजंटांमार्फत गर्भपातासाठी महिला नेमल्या जातात. एखादे प्रकरण उघडकीस आले तर, चौकशीसाठी समिती नियुक्त केली जाते. मंत्री भेट देतात. यापलीकडे काहीच होताना दिसत नाही.
कायद्यातील पळवाटांचा आधार
भ्रूणहत्याकांडात ‘बड्या’ डॉक्टरांचा सहभाग आहे. त्यांचे आरोग्य यंत्रणेशी लागेबांधे आहेत. हॉस्पिटलची कागदोपत्री तपासणी केली जाते. कोणी तक्रार केली तरच छाप्याचे नाटक केले जाते. त्यामुळे भ्रूणहत्याकांडाची ही मालिका अखंडितपणे सुरू आहे. पोलिसांकडे वैद्यकीय ज्ञान नसल्याने त्यांनाही तपासात अडचण निर्माण होते. त्यामुळे संशयित कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सहजपणे बाहेर येतात.