Sangli- कासेगाव खून प्रकरण: पिस्तूल पुरवणारा हत्यार तस्कर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 05:58 PM2024-08-21T17:58:54+5:302024-08-21T17:59:23+5:30
पोलिसांच्या कारवाईत आणखी एक पिस्तूल व काडतूस मिळाले
इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथे दि. १६ ऑगस्टच्या सकाळी साडेसातच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशयातून एका सावकाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या खुनासाठी पिस्तूल आणि काडतुसे पुरवणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. ही माहिती पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.
रितेश संतोष वायदंडे (वय २२, रा. कामेरी, ता. वाळवा) असे अटक केलेल्या हत्यारांची तस्करी करणाऱ्याचे नाव आहे. कासेगावातील पांडुरंग भगवान शिद (वय ४३) याचा खून करण्यासाठी मुख्य सूत्रधार सुरेश ताटे याने रितेश वायदंडे याच्याकडून ५० हजार रुपयात पिस्तूल आणि काडतुसे विकत घेतली होती. या खून प्रकरणी पोलिसांनी सुरेश ताटे याच्यासह विशाल भोसले (कामेरी), शिवाजी भुसाळे (इस्लामपूर) अशा तिघांना अटक केली आहे.
शिद याच्या खुनानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवताच वायदंडे याचे नाव रडारवर आले होते. त्यानुसार पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती. त्यावेळी पथकातील हवालदार अनिल पाटील व दीपक हांडे यांना वायदंडे हा नेर्ले येथील बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. चारही पथकांनी या परिसराला वेढा टाकत त्याला ताब्यात घेत असताना तो पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता रितेश वायदंडे याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात ठेवलेले एक जिवंत काडतूस मिळून आले.
पोलिस कर्मचारी प्रमोद रमेश पाटील यांनी रितेश वायदंडे याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, वाचक फौजदार जयनाथ चव्हाण, उपनिरीक्षक बाजीराव पाटील यांच्यासह सहायक फौजदार चंद्रकांत पवार, राजेंद्र पाटील, शरद जाधव, प्रशांत देसाई, विजय पाटील, सचिन चव्हाण, प्रमोद पाटील, संग्राम कुंभार, संदीप सावंत, सचिन पाटील यांनी भाग घेतला.