सांगली : शोभेच्या दारु स्फोटात कवठेएकंदला मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:56 PM2018-10-19T12:56:42+5:302018-10-19T12:58:34+5:30
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ऐतिहासीक विजयदशमीच्या सोहळ्याला शोभेच्या दारुच्या आतषबाजी करीत असताना कागदी शिंगट्याचा स्फोट झाल्याने प्रणव प्रवीण घाईल (वय १२) हा शाळकरी मुलगा ठार झाला.
सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ऐतिहासीक विजयदशमीच्या सोहळ्याला शोभेच्या दारुच्या आतषबाजी करीत असताना कागदी शिंगट्याचा स्फोट झाल्याने प्रणव प्रवीण घाईल (वय १२) हा शाळकरी मुलगा ठार झाला. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. घटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद आहे.
कवठेएकंद येथे विजयदशमी (दसरा) उत्साहात साजरी केली यानिमित्त शोभेच्या दारुची आतषबाजी केली जाते. गुरुवारी रात्रीपासून गावात शोभेच्या दारुची मोठ्या प्रमाणात आतषबाजी सुरु होते. ही आतषबाजी रात्रभर सुरु राहिली. पहाटे साडेचार वाजता प्रणव घराजवळ शोभेच्या दारुची आतषबाजी करीत होता.
कागदी शिंगट्याची आतषबाजी करीत असताना ते अचानक फुटून जोरात स्फोट झाला. त्याचा दटट्या डोक्याला लागल्याने प्रणव अंगणात कोसळला. घरच्यांनी त्याला तातडीने उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. पण उपचार सुरु असताना काही तासातच त्याचा मृत्यू झाला.
तासगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रवण कवठेएकंदमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमध्ये सहावीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. सकाळी अकारा वाजता गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.