अलमट्टीमुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, महापूर नियंत्रण समितीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 03:31 PM2022-08-02T15:31:17+5:302022-08-02T15:31:58+5:30
मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.
सांगली : कर्नाटकातील अलमट्टी, हिप्परगी धरणामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका नाही, हे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या भागाला अलमट्टी, हिप्परगी धरणामुळेच महापुराचा धोका आहे, असा दावाही महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत सोमवारी बैठक झाली. या बैठकीस महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, संजय कोरे, सतीश रांजणे, चंद्रकांत पाटील, सचिन सागरे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सर्जेराव पाटील, दिवाण म्हणाले की, डॉ. हेमंत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली २००६ मध्ये आयआयटी मुंबईचे दोन प्राध्यापक आचरे आणि साठे यांच्यासोबत समिती गठित केली होती. या तिघांच्या समितीचा अहवाल प्रशासनास सादर केला आहे. या अहवालात अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याच्या फुगवट्यामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याचा दावा केला आहे; परंतु तो अहवाल गायब आहे. तो पाठपुरावा करूनही मिळत नाही.
२००६ मध्ये इंजिनिअर्स व आर्किटेक्टच्या सभागृहातील कार्यक्रमात अलमट्टीचा फुगवटाही महापुरास कारणीभूत आहे, असे डॉ. धुमाळ म्हणाले होते. मग आता असे बोलून ते भ्रम निर्माण का करत आहेत? मुळात धुमाळ यांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करून बोलण्याची गरज होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे पूरग्रस्तांमध्ये नाराजी असल्यामुळे आम्ही त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करीत आहोत. अधिकाऱ्यांनी यापुढे अभ्यास करूनच मत व्यक्त करावे.
जनतेची दिशाभूल करू नये
माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मागील पुरात कर्नाटक सरकार आणि अलमट्टीतील अधिकाऱ्यांना विनंती करून अलमट्टीतून विसर्ग वाढविला होता. त्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा कमी होऊन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा महापुराचा धोका टळला होता, असे दोन्ही मंत्र्यांनी जाहीर केले होते. पुरास अलमट्टीच जबाबदार असल्याचे त्यांचेही ते म्हणणे होते. असे असताना जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे विधान करून जनतेची दिशाभूल करू नये, असेही पाटील, दिवाण म्हणाले.