सांगलीच्या कृष्णा नदीत पाच दिवसाचाच पाणीसाठा, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी
By शीतल पाटील | Published: October 26, 2023 05:57 PM2023-10-26T17:57:36+5:302023-10-26T17:58:09+5:30
सांगली : सांगली , कुपवाड शहराला दररोज ७४ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची ...
सांगली : सांगली, कुपवाड शहराला दररोज ७४ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळीत कमालीची घट झाली आहे. नदीपात्रात पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरच सांगली, कुपवाडवर पाणी टंचाईचे सावट गडद झाले आहे. महापालिकेने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून कोयना धरणातील पाण्याचे नियोजन कोलमडल्याने कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडत आहे. ऑगस्ट महिन्यात शहरावर पाणी टंचाईचे सावट होते. त्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली होती. आता दिवाळीच्या तोंडावर पुन्हा नदीचे पात्र कोरडे पडत आहे.
सांगली व कुपवाड या दोन शहराला कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. महापालिकेकडून दररोज ७४ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा केला जातो. सध्या जॅकवेलजवळ पाण्याची पातळी घटली आहे. त्यात नदीपात्रातही केवळ पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.