सांगली : शेखरवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला, पाहावयास मिळाले पावलांचे ठसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 04:53 PM2018-03-09T16:53:14+5:302018-03-09T16:53:14+5:30
शेखरवाडी (ता. वाळवा) येथील एका शेडमध्ये अभ्यास करीत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. तर काहीजणांना या बिबट्याच्या पावलांचे ठसेही पाहावयास मिळाले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
ऐतवडे बुद्रुक : शेखरवाडी (ता. वाळवा) येथील एका शेडमध्ये अभ्यास करीत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. तर काहीजणांना या बिबट्याच्या पावलांचे ठसेही पाहावयास मिळाले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. गेल्या १५ दिवसांत वाटेगाव, चिकुर्डे, कार्वे, ढगेवाडी, मरळनाथपूर, रेड, ऐतवडे बुद्रुक येथेही बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबतची माहिती अशी, शेखरवाडी येथील अशोक राबाडे यांच्या शेतातील शेडमध्ये अभ्यास करीत बसलेले विद्यार्थी सुशांत राबाडे, गणेश राबाडे व प्रवीण राबाडे यांना रात्री १0 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी तत्काळ गावातील लोकांशी संपर्क केला. थोड्याच वेळात अनेक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ग्रामस्थांची गर्दी वाढल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली.
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी संदीप शेखर व इतर शेतकऱ्यांना इंग्रूळ-शेखरवाडी दरम्यानच्या डोंगरामध्ये बिबट्या दिसला होता. तसेच कार्वे येथील बाबूराव शिंदे, जयसिंग पानिरे, योगेश पाटील, आदी शेतकऱ्यांना शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते. येथील डोंगरवाडी, इंग्रुळ, कार्वे, कापरी, शेखरवाडी, ढगेवाडी, मरळनाथपूर, रेड, ऐतवडे बुद्रुक गावांच्या परिसरात विस्तीर्ण असा डोंगर आहे. त्यामुळे या भागात बिबट्या लपण्यास जागा उपलब्ध असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या परिसरातील ग्रामस्थांनी यापूर्वी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्यासंबंधी माहिती दिली होती; परंतु वनविभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सध्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी गहू, हरभरा, शाळूची काढणी केली जाते.
विजेच्या वेळापत्रकाप्रमाणे दिवसा, तसेच रात्री पिकांना पाणी देण्यास शिवारात जावे लागते; परंतु बिबट्याच्या भीतीमुळे अनेकांनी रात्री शेतात जाणेच बंद केले आहे. दरम्यान, संदीप शेखर व ग्रामस्थांनी सांगितले की, परिसरातील भटकी कुत्री बिबट्याचे मुख्य खाद्य आहे. कारण अनेक भटकी कुत्री व शेतकऱ्यांची पाळीव कुत्रीही या बिबट्याने फस्त केली आहेत.