सांगली : वालचंदच्या गुणवत्तेचा संरक्षण क्षेत्रासाठी वापर करू : सुभाष भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:12 PM2018-05-30T16:12:41+5:302018-05-30T16:19:06+5:30

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेच्याबाबतीत वालचंद महाविद्यालय हे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मार्फत वालचंद महाविद्यालयीन गुणवत्तेचा उपयोग करून घेईन, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले.

Sangli: Let's use Walchand's quality for the defense sector: Subhash Bhamare | सांगली : वालचंदच्या गुणवत्तेचा संरक्षण क्षेत्रासाठी वापर करू : सुभाष भामरे

सांगली : वालचंदच्या गुणवत्तेचा संरक्षण क्षेत्रासाठी वापर करू : सुभाष भामरे

Next
ठळक मुद्देवालचंदच्या गुणवत्तेचा संरक्षण क्षेत्रासाठी वापर करू : सुभाष भामरे महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात

सांगली : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेच्याबाबतीत वालचंद महाविद्यालय हे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मार्फत वालचंद महाविद्यालयीन गुणवत्तेचा उपयोग करून घेईन, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले.

वालचंद महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ बुधवारी महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, वालचंदच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद, संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड आदी उपस्थित होते.

भामरे म्हणाले की, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये अभियंत्यांना खूप मोठी संधी आहे. सरकारने गेल्या काही वर्षात आपल्या धोरणांमध्ये व्यापक बदल केले आहेत. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांची क्षमता, त्यांची गुणवत्ता यांचा वापर संरक्षण विकासाकरिता करण्यात येत आहे.

वालचंद महाविद्यालयाच्या गुणवत्तेबाबतची चर्चा मी ऐकली होती. आज प्रत्यक्षात या महाविद्यालयात आल्यानंतर समाधान वाटले. देश-विदेशात अनेक मोठे अभियंते आणि अधिकारी या महाविद्यालयाने दिले आहेत. त्यामुळे संरक्षण संशोधन आणि विकास कार्यक्रमात या महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा वापर करता आला, तर ती अभिमानाची गोष्ट ठरेल.



अभियंते मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. अशावेळी त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला जातो. प्रत्यक्षात भारतासारख्या विशालकाय देशात अभियंत्यांना खूप काही करण्यासारखे आहे. त्यांचे कौशल्य देशातच नव्हे, तर विदेशातही चांगल्या पद्धतीने कामी येऊ शकते. त्यामुळे आत्मविश्वासाने त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करीत आपले करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

देवानंद शिंदे म्हणाले की, अभियंत्यांनी चाकोरीबद्ध क्षेत्रातच काम न करता, अधिक व्यापकतेने समाजाकडे पाहावे. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीही अभियंते आपले कौशल्य सिद्ध करू शकतात. नवे उपक्रम, नवे विचार, नवा दृष्टिकोन घेऊन येणाऱ्या अभियंत्यांसाठी आगामी काळ पोषक असेल. २0२0 नंतर देशभरात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची चलती राहील.

अभियंत्यांनी त्यासाठी तयार राहावे. सौरऊर्जा, स्वच्छ पाणी, नागरी विकास, प्रदूषणमुक्ती आदी अनेक प्रकारची आव्हाने देशासमोर आहेत. ती सोडविण्यासाठीही अभियंत्यांचेकौशल्य कामी येऊ शकते. संशोधक वृत्तीचे, प्रश्न सोडविणारे आणि नवनिर्माते म्हणून अभियंत्यांनी काम करावे. नवशिक्षणासाठी, प्रेम वाढीस लागण्यासाठी आणि जगण्यासाठी शिकत राहावे, असे त्यांनी सांगितले.

खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, पदवी घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी येथील उज्ज्वल परंपरा टिकवून ठेवावी. तुमच्या हातून समाजासाठी काही तरी चांगले कार्य घडत राहायला हवे. महाविद्यालयाने आजपर्यंत शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. त्यामुळे याठिकाणी शिक्षण घेऊन बाहेर पडताना त्याचा निश्चितच मोठा लाभ विद्यार्थ्यांना होईल.

अजित गुलाबचंद म्हणाले की, आगामी काळ कठीण, स्पर्धात्मक आणि चुरशीचा असला तरी, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने त्याला सामोरे जावे. गुणवत्तेचा पुरेपूर वापर केला, तर हे जग तुमच्यासाठी सर्वात सुंदरसुद्धा असेल. पदवी घेतली म्हणून तुमचे शिक्षण संपणार नाही.

बाहेरच्या जगात तुम्हाला सतत काही तरी शिकत राहावे लागेल. शिकण्याची ही वृत्ती जोपासावी. आजुबाजूची परिस्थिती, त्याठिकाणचे प्रश्न आणि घटना यांच्या सोडवणुकीसाठीसुद्धा अभियंत्याची दृष्टी महत्त्वाची ठरू शकते. तुम्हाला तुमची भूमिका कळली पाहिजे आणि कळाल्यानंतर त्यादृष्टीने तुमचे प्रयत्न आणि चिकाटी प्रत्यक्षात दिसली पाहिजे.

परिशवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, प्रभाताई कुलकर्णी, दीपक शिंदे, श्रीरंग केळकर आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा गौरव

२0१७-१८ या शैक्षणिक वर्षात बेस्ट आऊटगोर्इंग स्टुडंट म्हणून प्रतीक पी. पाटील, टीसीएस बेस्ट आऊटगोर्इंग स्टुडंट म्हणून शुभम् सावंत आणि बेस्ट स्पार्टस् पर्सन आॅफ द इअर म्हणून शंतनू विप्रदास यांना सन्मानित करण्यात आले. इन्स्टिट्यूट टॉपरचा बहुमान अनुक्रमे मयोद्दीन नाथानी, कार्तिक पाटील आणि दीपक अहिरे यांना मिळाला. याशिवाय विद्याशाखानिहाय २२ अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कारही प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते यावेळी करण्यात आला.

Web Title: Sangli: Let's use Walchand's quality for the defense sector: Subhash Bhamare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.