सांगली लोकसभा: प्रकाश शेंडगे यांच्या नावे पावणेपाच कोटींची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 07:30 PM2024-04-20T19:30:31+5:302024-04-20T19:33:36+5:30
पत्नी रेणुका यांचे नावे १९ लाख रुपये किमतीचे यॉट (समुद्रातील छोटे जहाज)
सांगली : लोकसभेसाठी प्रकाश शेंडगे यांनी अपक्ष म्हणून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत आर्थिक स्थिती प्रतिज्ञापत्रातून सादर केली.
त्यांनी आयकरकडे पाच वर्षांत ९६ लाख २९ हजार ६५० रुपयांचे उत्पन्न दाखविले आहे. विविध बँक खात्यांत १४ लाख ६५ हजार ०२३ रुपये असून एक लाखाची रोकड आहे. विविध कंपन्यांचे ५ लाख ४२ हजार ०६० शेअर्स आहेत. त्यांचे बाजारमूल्य ५७ लाख ७६ हजार ३५० रुपये आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यात १ लाख २६ हजार १३५ रुपये आहेत. विलास ट्रान्सपोर्ट कंपनीला ५२ लाख ६३ हजार ३७० रुपये आणि पीएसपीएल कंपनीला २९ लाख ३१ हजार ४० रुपयांचे कर्ज दिले आहे. त्यांच्याकडे २१ लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आहेत. मालकीची मोटर नाही.
विलास ट्रान्सपोर्ट ही १ कोटी २२ लाख ३६ हजार १७१ रुपये मूल्याची फर्म असून दोन कंपन्यांमध्ये एक लाख रुपयांची भागीदारी आहे. मूळ गाव केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे ४.१५ हेक्टर शेती व सांगलीत पाच गुंठे प्लाॅट आहे. त्याची एकत्रित किंमत ७५ लाख रुपये होते. भविष्य निर्वाह निधी योजनेसंदर्भात एक दावा २०१८ मध्ये मुंबईत दाखल आहे.
पत्नी रेणुका यांचे पाच वर्षांतील उत्पन्न ३२ लाख ५४ हजार ४५० रुपये आहे. विविध बँक खात्यांत २ लाख ९८ हजार ६८४ रुपये शिल्लक असून ७५ हजार रुपयांची रोकड आहे. १८ लाख १ हजार ५०० रुपये किमतीच्या विमा पॉलिसी आहेत. पीएसपीएल कंपनीला १४ लाख ११ हजार ८२० रुपयांचे कर्ज दिले आहे.
स्वत:चे यॉट
रेणुका यांच्या नावे १९ लाख रुपये किमतीचे यॉट (समुद्रातील छोटे जहाज) आहे. पावणेदोन किलो वजनाचे १ कोटी २२ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आहेत. साडेचार किलोंचे ३ लाख ५४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आहेत. एक मोटारही आहे. बांधकाम कंपनीत ५० हजारांची भागीदारी आहे. केरेवाडीत ६.२७ हेक्टर शेती असून तिची किंमत ६१ लाख १० हजार रुपये आहे. त्यांच्या नावे १४ लाख ७० हजार ७९० रुपयांचे वाहन कर्ज, ७ लाख ७५ हजार २५४ रुपयांचे व्यक्तिगत कर्ज, ४९ लाख १८ हजारांचे सुवर्ण कर्ज आहे.