सांगली लोकसभेची २००९ ची निवडणूक अपक्ष उमेदवारांमुळे निर्णायक, यंदा काय होणार?
By हणमंत पाटील | Published: April 24, 2024 04:21 PM2024-04-24T16:21:19+5:302024-04-24T16:22:10+5:30
अपक्षांची संख्या वाढतेय : २०१९, २०१४ ला मतांची टक्केवारी नगण्य
सांगली : गेल्या तीन लोकसभा निवडणुकीपासून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याकडे कल वाढत आहे. आगामी सांगली लोकसभा निवडणुकीत १२ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना एकूण पडलेल्या मतांची टक्केवारी सरासरी एक ते सव्वा टक्के इतकी आहे. केवळ २००९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद आहे. या निवडणुकीत तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांना (२५.४० टक्के) आणि विरोधातील अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे यांना (२२.७५ टक्के) मते मिळाली होती. या निवडणुकीतील एकूण अपक्षांच्या मतांची गोळाबेरीज विजयी उमेदवाराइतकी निर्णायक झाली होती.
सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला. त्यामुळे मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतरच्या सांगली लोकसभेच्या मागील २००९, २०१४, २०१९ या तीन निवडणुकांचा आढावा घेतला. त्यावेळी २००९ मधील अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे यांना मिळालेली ३ लाख ३८ हजार ही दुसऱ्या क्रमांकाची निर्णायक मते होती. त्यावेळी विजयी उमेदवार प्रतीक पाटील यांना ३ लाख ७८ हजार मते मिळाली होती.
मात्र, त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत एकूण ११ अपक्षांना मिळून साधारण २५ हजार मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत सहा अपक्षांना मिळून साधारण १५ हजार मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत बंडखोर विशाल पाटील यांच्यासह १२ अपक्ष रिंगणात आहेत. त्यांना मिळणाऱ्या मतांवर निवडणुकीतील विजय व पराभवाची गणिते ठरणार आहेत.
लोकसभा रिंगणातील अपक्षांची स्थिती
निवडणूक - संख्या - मते - टक्केवारी
२००९ - ९ - ३.७३ लाख - (२४ टक्के)
२०१४ - ११ -२५ हजार - (१.५ टक्के)
२०१९ -०६- १५ हजार - (०.७५ टक्के)