LokSabha2024: सांगलीचा ‘वाघ’ कोण? इस्लामपूर, तासगाव की कडेगावचा? उद्या फैसला
By हणमंत पाटील | Published: June 3, 2024 06:00 PM2024-06-03T18:00:09+5:302024-06-03T18:00:44+5:30
हणमंत पाटील सांगली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे तुम्ही वाघ असाल, पण आम्ही सांगली जिल्ह्याचे ‘वाघ’ आहोत, असे ...
हणमंत पाटील
सांगली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे तुम्ही वाघ असाल, पण आम्ही सांगली जिल्ह्याचे ‘वाघ’ आहोत, असे विश्वजित कदम यांनी जाहीर व्यासपीठावर ठणकावून सांगितले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या उद्याच्या (दि.४) निकालावरून जिल्ह्याला वारणेचा, तासगावचा की कडेगावचा वाघ मिळतो, ते ठरणार आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची राज्यभर उत्सुकता आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही तिकीट मिळविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना टोकाचा संघर्ष करावा लागला. प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, विशाल पाटील व जयश्री पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबई, दिल्ली व नागपूर दौरे केले. तरीही काँग्रेसजनांच्या पदरी निराशा आली.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेनेने सांगलीचे तिकीट दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी हट्टाने आणले. मात्र, नाराज झालेल्या काँग्रेसच्या सांगलीतील नेते व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारावर पहिल्या टप्प्यात बहिष्कार टाकला. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर टीकाटिप्पणी केली. त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या छुप्या पाठिंब्यावर बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी लढविली.
नाराज असूनही महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून विश्वजित कदम यांंनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात व्यासपीठावर उपस्थित दाखविली. त्यावेळी उद्धवजी तुम्ही राज्याचे वाघ आहात, पण जिल्ह्याचे वाघ आम्ही आहोत, असे कदम यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. त्यानंतर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या विधानाला प्रचारात फोडणी दिली. वाघ झुडपात लपून हल्ला करीत नाही, तर समोरून येतो. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, तर तुम्हाला आम्ही खरेच वाघ समजू, अशी टिप्पणी राऊत यांनी केली. त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक म्हणजे सांगली जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या वर्चस्वाची लढाई मानली जात आहे.
जिल्ह्याच्या नेतृत्वाचा संघर्ष..
१९८०च्या दशकात वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना राज्यातील सत्तेची सूत्रे सांगलीतून हलविली जात होती. १९९०च्या दशकानंतर ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, जयंत पाटील व मदन पाटील या चार नेत्यांचा दबदबा सांगली जिल्ह्याच्या राजकारणात होता. दरम्यान, २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत जिल्ह्यातील आबा, भाऊ व साहेब अशा तिन्ही दिग्गज नेत्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या नेतृत्वाची पोकळी जयंत पाटील यांनी भरून काढली. त्यामुळे सांगलीचे नेतृत्व वारणेच्या वाघाकडे आहे, असे सांगलीत म्हटले जात. दरम्यान, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि २०१९ च्या निवडणुकीनंतर विश्वजित कदम यांचे नेतृत्व पुढे आले. तेही महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले अन् पुन्हा जिल्ह्याच्या नेतृत्वाचा संघर्ष सुरू झाला.
अन् नेत्यांच्या तडजोडीला तडे..
दरम्यानच्या काळात या दोन्ही नेत्यांशी तडजोड करीत संजयकाका पाटील यांनी खासदार म्हणून सलग १० वर्षे जिल्ह्यात आर. आर. पाटील यांच्यानंतर पुन्हा एकदा तासगावचे वर्चस्व कायम ठेवले. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र या तिन्ही नेत्यांच्या तडजोडीला तडे गेले. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमागील विश्वजित कदम यांची पडद्यामागील भूमिका, उद्धवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी जयंत पाटील यांनी वाजविलेली तुतारी आणि संजयकाका यांचा भाजपात ‘एकला चलोरे’चा बाणा, या वेगवेगळ्या भूमिकांमुळे तिन्ही नेते आमने-सामने आले आहेत अन् लोकसभेच्या निकालानंतर वारणेचा, तासगावचा की कडेगावचा नेता जिल्ह्याचा वाघ होणार हे ठरणार आहे.