...तर संजय पाटील जिंकले असते?, सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास अनेक घटक कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:07 PM2024-06-06T16:07:23+5:302024-06-06T16:09:33+5:30
'हे' नेते गेले विराेधात
सांगली : विजयाबद्दलचा अतिआत्मविश्वास, नरेंद्र मोदींच्या जादूवर विसंबून राहण्यातील धन्यता तसेच अंतर्गत गटबाजीकडे केलेले दुर्लक्ष अशा अनेक घटकांमुळे भाजपने सांगली लोकसभेचा गड गमावला. नव्या चिन्हासह अपक्ष निवडणूक लढवूनही विशाल पाटील यांनी मिळविलेला विजय भाजपला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे. नको त्या गोष्टीत ताकद लावण्यापेक्षा आवश्यक तिथे ऊर्जा खर्ची केली असती, तर संजय पाटील निवडून आले असते, असा तर्क लढविला जात आहे.
सर्वात अगोदर उमेदवारी जाहीर करून पक्ष कार्यालय थाटणाऱ्या भाजपला प्रचारासाठी सर्वाधिक वेळ मिळाला होता. पण, उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यातून उफाळलेली नाराजी दुर्लक्षित करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धन्यता मानली. दुसरीकडे उमेदवार असलेले संजय पाटील यांच्या समर्थकांनीही गटबाजीला सबुरीने हाताळण्याऐवजी ‘जशास तसे’ भूमिका स्वीकारली. त्यामुळे वाद शांत होण्याऐवजी चिघळत गेला. वाद मिटविण्यासाठी उमेदवारासह एकाही वरिष्ठ नेत्याने राजकीय कौशल्य वापरले नाही.
जतचे माजी आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख यांची नाराजी त्यांना शेवटपर्यंत दूर करता आली नाही. मिरजेतील काही नगरसेवकांनीही संजय पाटील यांच्याविरोधात उघडपणे काम सुरू केले. त्यांना शांत करण्याची जबाबदारी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घेतली, मात्र ते त्यात फारसे यशस्वी झाले नाहीत. मतदान जवळ आल्यानंतर केलेली धडपड कामी आली नाही. सर्व नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यामागे मोदी मॅजिकवरील अवलंबित्व हेच कारण होते.
नको त्या गोष्टीत ताकद
प्रतिस्पर्धी उमेदवारासमोर अनेक अपक्ष उमेदवार उभे करणे, चांगले चिन्ह मिळू नये यासाठी बुद्धीचा वापर करणे, विजयासाठी आवश्यक माहितीचे संकलन करण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या व्यक्तिगत जीवनातील माहिती गोळा करणे अशा गोष्टीतच उमेदवाराच्या समर्थकांनी अधिक ताकद खर्ची घातली.
मतांच्या विभागणीवरच अधिक लक्ष
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यात मतांची विभागणी होऊन भाजपला फायदा झाला होता. तोच फॉर्म्युला यंदाच्या निवडणुकीत वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आला. मात्र, ही खेळी काँग्रेस नेत्यांनी प्रचारापूर्वीच उजेडात आणल्याने भाजपचे हे छुपे अस्त्र निकामी झाले.
..तर निकाल वेगळा असता
काँग्रेसमध्ये आमदार विश्वजीत कदम यांनी गटबाजीला मूठमाती देऊन सर्व नेत्यांची मोळी जशी बांधली तशी भाजपला बांधता आली असती तर कदाचित यंदाच्या लोकसभेत भाजपच्या पदरात यश पडले असते. पण, त्यांना या निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला.
हे नेते गेले विराेधात
जतमधून माजी आमदार विलासराव जगताप, कडेगावमधून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या स्वकीय नेत्यांसह कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे, खानापूर मतदारसंघातून बाबर कुटुंबीय यांच्याशी संजय पाटील यांचे सूर कधीच जुळले नाहीत. नेमकी हीच गोष्ट विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडली. वेळीच नात्यांची डागडुजी झाली असती तर त्याचा फायदा संजय पाटील यांना झाला असता.