चंद्रहार पाटील यांची मालमत्ता ४ कोटींहून अधिक, डोक्यावर 'इतक्या' लाखाचे कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 07:21 PM2024-04-20T19:21:47+5:302024-04-20T19:23:12+5:30
४७ लाखांची मोटार; मारहाणीचा गुन्हा
सांगली : सांगली लोकसभेच्या मैदानात महाविकास आघाडीकडून शड्डू मारण्यास सज्ज असलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी ३८ लाख रुपये इतकी आहे. तर चार लाख ५८ हजार रुपये कर्जाचा भार त्यांच्या डोक्यावर आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या चंद्रहार पाटील यांनी लोकसभेसाठी प्रथमच शड्डू ठोकत शिवसेनेत प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये जंगम मालमत्ता ६५ लाख ३१ हजार ६२३ रुपये इतकी दर्शवली आहे. तर स्थावर मालमत्ता ३ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपये असल्याचे नमूद केले आहे. एकूण मालमत्ता ४ कोटी ३८ लाख ९० हजार रुपये आहे. तर ४ लाख ५८ हजार रुपये कर्ज दाखवले आहे.
चंद्रहार पाटील ४७ लाखांच्या मोटारीतून फिरतात. त्यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाची कला शाखेची पदवी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन पूर्ण केले आहे.
मारहाणीचा गुन्हा
चंद्रहार यांच्याविरुद्ध शासकीय लोकसेवकास मारहाण केल्याबद्दल विटा पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल आहे. तसेच मारहाणीचा एक अदखलपात्र गुन्हाही नोंद आहे.
मालमत्तेवर बोजा
गौणखनिज उत्खनन करून साठा केल्याबद्दल महसूल विभागाने २८ लाख ७५ हजार रुपयांचा बोजा त्यांच्या मालमत्तेवर नोंदवला आहे.