सांगली : करगणीतील लूटमार; तिघांच्या टोळीस अटक-बलवडी रस्त्यावर सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:08 PM2018-11-24T13:08:15+5:302018-11-24T13:12:44+5:30
येथील अक्षय मोहन दबडे यांना बेदम मारहाण करुन लुबाडणाºया तिघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुरुवारी रात्री यश आले. टोळीकडून मोबाईल, दुचाकी व रोकड असा एक लाखाचा माल जप्त केला आहे
सांगली : करगणी (ता. आटपाडी) येथील अक्षय मोहन दबडे यांना बेदम मारहाण करुन लुबाडणाºया तिघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुरुवारी रात्री यश आले. टोळीकडून मोबाईल, दुचाकी व रोकड असा एक लाखाचा माल जप्त केला आहे. गोमेवाडी-दबडेवाडी रस्त्यावर १७ नोव्हेंबरला लूटमारीची ही घटना घडली होती.
अटक केलेल्यांमध्ये सुजित ऊर्फ आनंदा तुकाराम काळे (वय २३, रा. लेंगरे), मिलिंद जनार्दन गिड्डे (२१, वारे हॉस्पिटलजवळ, विटा, ता. खानापूर) व अक्षय शामराव साठे (२३, आंबेगाव, ता. कडेगाव) यांचा समावेश आहे. त्यांना पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अक्षय दबडे हे करगणीत लक्ष्मीनगरमध्ये राहतात. त्यांचा बिअर बार आहे. १७ नोव्हेंबरला ते रात्री पावणेअकरा वाजता दुकान बंद करुन दुचाकीवरुन घरी निघाले होते. गोमेवाडी-दबडेवारी रस्त्यावर रेड्याचे टेक येथे ते गेल्यानंतर संशयितांनी त्यांना अडविले. त्यांना बेदम मारहाण केली व त्यांच्याकडील ४६ हजाराची रोकड, एक मोबाईल घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.
दबडे यांना लुबाडणारी ही टोळी खानापूर तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली. तसेच गुरुवारी रात्री ते बलवडी-तामखडी रस्त्यावरुन जाणार असल्याचीही माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, पोलीस शिपाई सूर्यकांत सावंत, जितेंद्र सावंत, नीलेश कदम, उदय साळुंखे, संदीप पाटील, अरुण सोकटे यांच्या पथकाने सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे एकाच दुचाकीवरुन जाताना आढळून आले. त्यांना थांबवून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दबडे यांना लुबाडल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १३ हजाराची रोकड, चार मोबाईल व हेल्मेट असा एक लाखाचा माल जप्त केला.
पाळत ठेवून लुबाडले
अटकेतील तिघे पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. त्यांनी पाळत ठेवून दबडे यांना लुबाडल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी त्यांनी लूटमारीचे गुन्हे केले आहेत का? याबद्दल चौकशी केली जात आहे. दबडे यांच्याकडून मिळालेली ४६ हजाराची रोकड त्यांनी समान वाटणी करुन घेतली होती.