सांगलीत मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धा 14 आॅक्टोबरपासून, 25 संघांची होणार निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 04:54 PM2017-09-19T16:54:56+5:302017-09-19T17:12:36+5:30
तब्बल एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक असलेल्या मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला १४ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेसाठी राज्यभरातील २५ संघांची निवड केली जाणार आहे.
सांगली, दि. 19 - तब्बल एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक असलेल्या मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला १४ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेसाठी राज्यभरातील २५ संघांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांना तब्बल तीन लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून, प्रथम विजेत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणारी ही राज्यातील पहिलीच स्पर्धा असल्याचे महापौर हारुण शिकलगार व स्पर्धेचे कार्याध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
महापालिकेच्यावतीने मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात १४ ते १६ आॅक्टोबर असे तीन दिवस या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी आॅनलाईन प्रवेशिका मागविण्यात आल्या असून, १ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. स्पर्धेत निमंत्रित २५ संघांनाच प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील हौशी नाट्यसंस्था, महाविद्यालये यांचा मागील तीन वर्षांच्या इतर राज्य एकांकिका स्पर्धेतील सहभाग व इतर अटींची पूर्तता करणाºया संघांना स्पर्धेत सहभागी करून घेतले जाईल.
स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला एक लाख रुपये व मानाचा मदनभाऊ महाकरंडक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये व करंडक, तृतीय क्रमांकास २५ हजार रुपये व करंडक, तर उत्तेजनार्थ दोन संघांना दहा हजार रुपये व करंडक बक्षीस देण्यात येईल. सांगली जिल्ह्यातील संस्थांनाही या स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी जिल्हास्तरीय फेरी घेण्यात येणार आहे. जिल्हा प्राथमिक फेरी १ आॅक्टोबर रोजी होत आहे. या फेरीतून जिल्ह्यातील संघाची अंतिम स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील संस्थांना २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
गतवर्षीपासून माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. एक लाखाचे पारितोषिक देणारी ही राज्यातील पहिली व एकमेव स्पर्धा आहे. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. राज्यातील एकूण १२३ संघांनी नोंदणी केली होती. स्पर्धा संयोजन समितीने त्यातील २६ संघांची स्पर्धेसाठी अंतिम निवड केली होती. या स्पर्धेसाठी मुंबई, कोल्हापूर, डोंबिवली, पुणे, नागपूर, सोलापूर, कुडाळ, जळगाव, अमरावती, औरंगाबाद, महाड, गोवा, कल्याण येथील संघांनी भाग घेतला होता. यंदाही राज्यभरातून संघ स्पर्धेत सहभागी होतील, असा विश्वास महापौर शिकलगार यांनी व्यक्त केला. या स्पर्धेचे संयोजन शफी नायकवडी, राजेंद्र पोळ, विनायक केळकर, मुकुंद पटवर्धन, अरुण दांडेकर, विजय कडणे, चंद्रकांत धामणीकर, डॉ. विलास कुलकर्णी, मारुती नवलाई, मंगेश येडूरकर, अंजली भिडे, मनीषा काळे करीत आहेत.