सांगली : महावितरणची यंत्रणा पहिल्याच पावसाने ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:32 PM2018-05-12T13:32:31+5:302018-05-12T13:32:31+5:30
गुरूवारी सायंकाळी सांगली शहरात झालेल्या वळिवाच्या पहिल्याच पावसाने महावितरणची यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसून आले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सर्व उपनगरांतील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता, तर काही उपनगरांत शुक्रवारी सायंकाळपर्यंतही वीज गायबच होती.
सांगली : गुरूवारी सायंकाळी सांगली शहरात झालेल्या वळिवाच्या पहिल्याच पावसाने महावितरणची यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसून आले.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सर्व उपनगरांतील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता, तर काही उपनगरांत शुक्रवारी सायंकाळपर्यंतही वीज गायबच होती. दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी रात्रीपर्यंत काम केल्याने काही भागात विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकला.
गुरूवारी सायंकाळी सांगली शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यशवंतनगर, वसंतनगर परिसरात वादळी वारे व पावसाचा जोर अधिक होता. शहरातही पावसापेक्षा वारे अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी डिजिटल फलक फाटून वीजतारांत अडकल्याने तारा तुटण्याच्या घटना घडल्या.
अचानक वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने महावितरणची मात्र कसोटी लागली. महावितरणकडून पावसाळापूर्व विद्युत वाहक तारा झाडांच्या फांद्यांपासून मोकळ्या करण्याचे काम सुरू असतानाच, गुरूवारी फांद्या तुटून तारांवर पडल्याने अधिक नुकसान सोसावे लागले.
सिव्हिल चौकातील भुयारी लाईनमध्ये बिघाड झाल्याने त्या भागातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद होता. हा बिघाड दुरूस्त करून गुरूवारी रात्रीच वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
जलतरण तलाव, भगतसिंग चौक, शामरावनगर, गजराज कॉलनी, रॉकेल लाईन वखारभाग, मिशन कंपौंड, राम मंदिर चौक, काळीखण, टिंबर एरिया, जोतिबा मंदिर, गावभाग, सांगलीवाडी, जुने जिल्हाधिकारी कार्यालय या भागात झाडांच्या फांद्या पडून तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या सर्व ठिकाणी पर्यायी व्यवस्था (रिंंग फिडींग) करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता
गुरूवारी रात्री साडेआठपर्यंत वादळी वारे व पाऊस सुरू होता. त्यानंतरही वारे कायम असताना महावितरणचे कर्मचारी तमा न बाळगता तारा जोडणीसाठी रात्रीच कार्यरत होते. रात्र जागून काढत कर्मचाऱ्यांनी काही भागातील वीज पुरवठा सुरळीत केला.
यशवंतनगरमध्ये २४ तास वीज गायब
यशवंतनगरमध्ये विद्युत तारा तुटल्याने गुरूवारी सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित होता. शुक्रवारी सायंकाळीही तो सुरळीत झाला नव्हता. विश्रामबाग येथून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानेच या भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यात अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.